चंद्रपूर: झोपेत असताना हायवा ट्रक घरात घुसून 2 जणांचा मृत्यू
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

चंद्रपूरमध्ये (Chandrapur) रविवारी पहाटे गिट्टीने भरलेला ट्रक घरात घुसून दोन जणांचा मृत्यू (Two Die) झाला आहे. घरात झोपलेल्या दोन जणांना या ट्रकने चिरडले (Accident). त्यामुळे या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील चेकठाणा येथे रविवारी पहाटे 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. उमाजी तिवाडे (वय 40) आणि देविदास वासूदेव झगडकर (वय 45) असे या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. सध्या पोंभुर्णा पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.

शेतीच्या कामासाठी देविदास झगडकर व उमाजी तिवाडे हे शनिवारी चेकठाणा येथे आले होते. उशिर झाल्याने ते चेकठाणा येथील नातेवाईक सोनटक्के यांच्या घरी झोपी गेले. सोनटक्के यांचे घर बसस्थानक परिसरात आहे. या दोघांनी सोनटक्के परिवारासोबत सहभोजन केले आणि झोपी गेले. (हेही वाचा - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभुमीवर आसाम येथे बॉम्बस्फोट, तपास सुरु)

सोनटक्के यांच्या घरातील पहिल्या खोलीत झगडकर आणि तिवाडे झोपले होते. तसेच दुसऱ्या खोलीत सोनटक्के यांचे कुटूंब झोपले होते. दरम्यान, रविवारी पहाटे 5 वाजता नंदोरी येथून गिट्टीने भरलेला भरधाव हायवा ट्रक जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हायला ट्रक सोनटक्के यांचा घरातच शिरला. यात सोनटक्के यांच्या पहिल्या खोलीत झोपलेल्या झगडकर आणि तिवाडे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.