Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नागपूर (Nagpur) मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. दोन कोरोना बाधित वृद्धांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या काही तासांच्या फरकाने आत्महत्येच्या घटना समोर आल्या.  पुरुषोत्तम गजभिये (81) आणि वसंतराव कुटे (68) अशी आत्महत्या करणाऱ्या वृद्धांची नावे आहेत. दोघांनीही नैराश्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथिमक अंदाज आहे. (धुळे: कोरोना झाल्याची भीतीपायी शिक्षकाची आत्महत्या, शिरपूर येथील धक्कादायक घटना)

81 वर्षीय पुरुषोत्तम गजभिये यांना कोरोनाची लागण झाली असून ते नागपूर मधील सरकारी रुग्णालयात दाखल होते. काल संध्याकाळी त्यांनी कोविड वॉर्डच्या बाथरुममध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. बाथरुममध्ये गेलेले पुरुषोत्तम बराच वेल बाहेर न आल्याने स्वच्छता कर्मचारी पाहण्यासाठी आत गेल्यावर आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. 26 मार्च रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दुसरी घटना नागपुरातील अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत पंच्याशी प्लॉट परिसरात घडली. 68 वर्षीय वसंतराव कुटे यांनी देखील राहत्या घरी गळफास घेत आपले जीवन संपवले. मुतखड्याच्या आजाराने त्रस्त असलेल्या कुटे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या घरातील इतर सदस्यही कोरोना बाधित होते. दरम्यान, आजारपणातील नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. दिवसागणित रुग्णसंख्येत मोठी भर पडत असून. मृतांचा आकडाही प्रचंड वाढत आहे. मात्र आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याने तातडीने त्याचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दरम्यान, सध्याची कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव, आयसोलेशन यामुळे नैराश्य वाढण्याची शक्यता आहे. यातूनच आत्महत्येसारखं पाऊल उचललं जातं.