कोरोना व्हायरस (Coronavirus) पुन्हा एकदा राज्यात डोकं वर काढू लागले आहे. यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा घबराट वाढली आहे. कोरोनाची सदृश्य लक्षणे आढळल्याने शिरपूर मधील एका शिक्षकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, धुळे जिल्ह्यातील शिरपूर (Shirpur) येथील राजेंद्र भानुदास पाटील या शिक्षकाने तापी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. कोरोना झाल्याच्या भीतीतून त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांकडून कळत आहे.
शिरपूर येथील रहिवासी असणारे राजेंद्र भानुदास पाटील यांना कोरोना सदृष लक्षणे दिसून आली होती. राजेंद्र पाटील यांनी पुढील तपासणीसाठी नमुने दिले होते. सदरची तपासणी केली असता त्यांना न्यूमोनिया झाला असल्याचं समोर आलं होतं.हेदेखील वाचा- धक्कादायक! हिंगोलीत एका माथेफिरूने आजीसह मावशीची केली कु-हाडीने वार करुन केली हत्या
मात्र दिलेल्या नमुन्यांचा अहवाल येणे बाकी असताना आपल्याला कोरोना झाला आहे या भीतीतून राजेंद्र पाटील यांनी तापी नदीवरील सावळदे फाटा येथून उडी मारून नदीत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
कोरोना झाल्याच्या भीतीतून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची माहिती राजेंद्र पाटील यांच्या नातेवाइकांनी दिली आहे. दरम्यान घटनास्थळी राजेंद्र पाटील यांची दुचाकी गाडी तसेच डॉक्टरांची फाईल मिळून आली आहे. या घटनेमुळे शिरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, राजेंद्र पाटील यांच्या मृतदेहाचा शोध घेण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू होतं. अखेर त्यांचा मृतदेह मिळाला असून त्याचे शवविच्छेदन शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येत आहे. राजेंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.