जालना (Jalna) जिल्ह्यातील अंबड तालुक्यात (Ambad Taluka) धनगरप्रिंप्री (Dhangarprimpri) गावात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. वैष्णव ज्ञानेश्वर बहुले आणि गौरव ज्ञानेश्वर बहुले, अशी या दोघा भावडांची नावे आहेत. यातील वैष्णव हा इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होता. तर वैष्णवचा धाकटा भाव म्हणजेचं गौरव बहुले इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होता. या धक्कादायक घटनेमुळे धनगरप्रिंप्री गावात एकच खळबळ उडाली आहे. तसेच एकाच घरातील दोन मुलांचा मृत्यू झाल्याने बहुले कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
प्राप्त माहितीनुसार, वैष्णव आणि गौरव हे दोघे आपल्या आईसोबत शेतात गेले होते. त्यानंतर सायंकाळी आईने या दोघांना घरी जाण्यास सांगितले. मात्र, जेव्हा वैष्णव आणि गौरवची आई घरी पोहोचली तेव्हा ते दोघे घरी पोहोचलेले नव्हते. बऱ्याच वेळ झाला तरी मुलं घरी आली नाही म्हणून कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. (हेही वाचा - Buldhana Accident: बुलढाणा येथे टँकर आणि मोटारसायकलच्या भीषण अपघात; एकाच कुटुंबियातील तिघांचा मृत्यू)
दरम्यान, कुटुंबियांना शेततळ्याच्या गेटवर एकाची चप्पल आढळून आली. त्यामुळे त्यांनी या दोघांचा शेततळ्यात शोध घेतला. त्यानंतर दोन्गी मुलं शेततळ्यात आढळून आली. त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तेथे डॉक्टरांनी वैष्णव आणि गौरवला मृत घोषित केलं. हे ऐकताचं कुटुंबियांनी हंबरडा फोडला.
मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णव आणि गौरव रस्त्याच्या कडेला असलेल्या शेततळ्यात पाणी पाहण्यासाठी गेले होते. मात्र, दोघांचा यात बुडून मृत्यू झाला. धनगरपिंपरी शेतशिवारातील गट नंबर 220 मधील शेतकरी शरद जेठमलानी देसरडा यांच्या शेतातील शेततळ्यात ही घटना घडली. विशेष म्हणजे ज्ञानेश्वर बहुले यांना गौरव आणि वैष्णव ही दोनचं मुलं होती. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.