Representational Image (Photo Credits: PTI)

Tutari Express - Dadar to Sawantwadi Road:  कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांची गर्दी पाहता आता दादर-सावंतवाडी (Dadar to Sawantwadi) या तुतारी एक्सप्रेसला (Tutari Express)  चार अतिरिक्त डब्बे जोडले जाणार आहेत. मुंबईतून कोकणाकडे जाणार्‍या चाकरमान्यांची गर्दी पाहता आता हा मोठा दिलासादायक निर्णय आहे. 11 नोव्हेंबर पासून कोकणात जाणार्‍या तुतारी एक्सप्रेसला आता हे अतिरिक्त डब्बे जोडले जाणार आहेत.

तुतारी एक्सप्रेस ही रात्री 12 च्या सुमारास मुंबईकडून निघते. त्यामुळे रस्ते वाहतूकीपेक्षा कोकणात जाणारे अनेक चाकरमनी रेल्वेने प्रवास करणं अधिक पसंत करतात. नव्या तुतारी एक्सप्रेसमध्ये वातानुकूलित थ्री टीअर, स्लीपर श्रेणीतील एक डब्बा वाढवण्यात आला आहे. जनरल द्वितीय श्रेणीतील दोन डब्बे वाढवले जाणार आहेत. त्यामुळे कोकणात अधिक प्रवासी सुखकर प्रवास करू शकणार आहेत.

कोकणात जाणार्‍या रेल्वेप्रवाशांना 4 महिने आधीच तिकीट बुकिंग करावं लागतं. अनेकदा यामध्ये हाऊसफुल्ल बुकिंगमुळे ट्रेनमध्ये जबरदस्ती चढणं, विशिष्ट स्थानकावर ट्रेनचे दरवाजे न उघडल्याने दगडफेक करणं असे प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रेनच्या फेर्‍या वाढवण्याची मागणी सुरू आहे. सध्या रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करून ट्रेनचा वेग वाढवला आहे. 1 नोव्हेंबरपासून ट्रेनच्या वेळापत्रकात बदल झाले आहेत.