Tulajabhavani Temple (PC - Wikimedia Commons)

Coronavirus: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्या आज आकडा 38 वर पोहचली आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र भीतीमय वातावरण निर्माण झालं आहे. अशातच राज्य सरकारकडून गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच राज्यातील मॉल्स, जीम, शाळा आदी गर्दीचे ठिकाणं बंद ठेवण्यात आले आहेत. अशात आता तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे मंदिरही (Tulajabhavani Temple) बंद करण्यात आलं आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार येत्या 31 मार्चपर्यंत तुळजाभवानीचे मंदिर बंद असणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी लोखो भाविक येत असतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंदिर प्रशासनाने तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील सर्व विधी पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यास सांगितले आहेत. विशेष म्हणजे भाविकांसाठी प्रशासनाने या काळात ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे. यासंदर्भात प्रशासनाने माहिती दिली आहे. (हेही वाचा - Coronavirus In Maharashtra: मुंबई, नवी मुंबई सह यवतमाळ मध्ये आढळले कोरोनाचे 5 नवे रुग्ण; महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 38)

राज्यात कोरोना विषाणूची दहशत पसरत आहे. या विषाणूपासून वाचण्यासाठी लोक गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळत आहेत. मागील आठवड्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे भरली जाणारी नाथषष्ठी यात्रा रद्द करण्यात आली होती. कोरोनामुळे सध्या राज्यात धार्मिक स्थळांवरील गर्दी कमी होऊ लागली आहे.

आज मुंबईमध्ये आणखी 3 कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. तसेच नवी मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तसेच यवतमाळमध्ये देखील आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या 38 वर पोहचली आहे.