गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी होणार वृक्षतोडी? 110 झाडांवर येणार का कुऱ्हाड?
Tree cutting (Photo credit: Archived, edited, representative images)

मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी आरे येथील वृक्षतोड करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईतील अनेक नागरिकांनी याला कडाडून विरोध केला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी वृक्षतोड करण्यात येत असल्याच्या बातम्या देखल पसरल्या होत्या. आणि आता दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी झाडांची कत्तल करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी जवळपास 100 हून अधिक झाडे टोण्यात येणार आहेत असं बोललं जातंय. यामुळे आता या स्मारक बांधणीसाठी पर्यावरणप्रेमींकडून विरोध होण्याची शक्यता आहे.

गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक औरंगाबाद येथे उभारण्यात येणार आहे व राज्यसरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने औरंगाबाद महापालिकेला पत्र पाठवत मुंडेंच्या स्मारकासाठी 110 झाडांवर कुऱ्हाड चालवण्याबाबत परवानगी मागितली आहे. परंतु महापालिका प्रशासनाने याबाबत अद्याप तरी कोणताही निर्णय दिलेला नाही.

दरम्यान, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक औरंगाबाद मधील शासकीय दूध योजनेच्या जागेवर उभारण्यात येणार आहेत. सिडकोतर्फे मुंडेंच्या स्मारकाचे बांधकाम केले जाणार असून स्मारकाच्या कामासाठी महाराष्ट्राच्या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे.

गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडे यांची नाव न घेता भाजप पक्ष नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका, 27 जानेवारीला करणार लाक्षणिक उपोषण

तर दुसरीकडे राज्यात भाजप सरकारची सत्ता गेल्यावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकासआघाडीने सत्तास्थापन केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्र हातात घेतल्यावर आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोडीवर स्थगिती आणली. नंतर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते औरंगाबादमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाकडे. आणि आता गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाकडे.