
जालना (Jalna) जिल्ह्यातील परतूर येथील व्यापारी राजेश नहार (Rajesh Nahar) यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात राजेश नहार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. भर रस्त्यात घडलेल्या या गोळीबार आणि हत्या प्रकरणाने जालना जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. जालना जिल्ह्यातील डांबरी गावाजवळ शनिवारी रात्री ही घटना घडली.
नहार हे शनिवारी जालन्याहून परतूरकडे त्यांच्या चारचाकी वाहनाने जात होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला. जालन्यातील व्यापारी सिंघवी आणि बांधकाम व्यवसायिक गौतम मुनोत यांना गोळ्या घालून हत्येची सुपारी देण्याच्या प्रकरणात राजेश नहार यांना अटक करण्यात आली होती, परंतु, त्यांना न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. (हेही वाचा - बोईसर: तारापूर एमआयडीसी येथील कारखान्यात भीषण स्फोट; 8 कामगारांचा मृत्यू)
दरम्यान, या घटनेची माहिची मिळताच जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिक तपास करत आहेत.