कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटकाळात सध्या देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन सुरु आहे. अशावेळी जनतेने घराबाहेर पडून नये याबाबत सरकार गेले काही दिवस जनजागृती करत आहे. म्हणूनच या काळात येणारे सण-उत्सव साजरे करण्याचे लोकांनी टाळले आहे. आता येत्या 14 एप्रिलला डॉ. बाबसाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti) यांची जयंती आहे, मात्र हा दिवस सर्वांनी आपल्या कुटुंबियांसह घरच्याघरी साजरा करावा, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पुणे शहराच्या वतीने जनतेला करण्यात आले आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंतीही या लॉक डाऊनच्या काळात 11 एप्रिल रोजी आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनीही जनतेला हा दिवस घरीच साजरा करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ही जयंती आपल्या घरी साजरी करून, त्याबाबतचे फोटो अथवा व्हिडिओज सोशल मिडियावर शेअर करावेत. मात्र कोणतीही परिस्थितीमध्ये या दोन्ही महापुरुषांच्या जयंत्या सार्वजनिक रितीने साजऱ्या करू नये. हा जयंतीचा निधी सध्याच्या संकटकाळातील लोकांना मदत म्हणून द्यावा, असेही ते म्हणाले. (हेही वाचा: लॉकडाऊनच्या काळात भाजप आमदाराने वाढदिवसानिमित्त आयोजित केला धान्यवाटप कार्यक्रम; संचारबंदी असताना उसळली तुफान गर्दी)
‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनीसुद्धा ही जयंती कशी साजरी करावी याबाबत पत्रक काढले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, विविध पक्षाचे कार्यकर्ते, सार्वजनिक मंडळे, संस्था, संघटना यांनी पुतळ्यावर जमा होऊ नये, मिरवणुका काढू नयेत, रस्त्यावर येऊन गर्दी होईल असे कोणतेही कार्यक्रम करू नये. तसेच जितेंद्र आव्हाड यांनीही आपल्या घरी असलेल्या बाबासाहेबांच्या फोटोसमोरच नतमस्तक होऊन ही जयंती साजरी करावी असे सांगितले आहे.