धक्कादायक! लॉकडाऊनच्या काळात भाजप आमदाराने वाढदिवसानिमित्त आयोजित केला धान्यवाटप कार्यक्रम; संचारबंदी असताना उसळली तुफान गर्दी
दादाराव केचे वाढदिवस (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या देशात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) 3374 रुग्णांची नोंद झाली आहे व दिवसेंदिवस ही संख्या वाढतच आहे, यावर उपाययोजना म्हणून देशात 21 दिवसांचे लॉक डाऊन (Lockdown) सुरु आहे. या काळात महत्वाची कामे सोडून घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येत आहे, सरकार लोकांनी घरातच राहावे यासाठी जनजागृती करत आहे. मात्र आज वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आर्वी (Arvi) येथे धक्कादायक प्रकार समोर आला. इथल्या मतदारसंघातील भाजप आमदार दादाराव केचे (BJP MLA Dadarao Keche) यांच्या वाढदिवसानिमित्त आज धन्यवाटपाचा कार्यक्रम आजोजित केला होता. या कार्यक्रमासाठी तुफान गर्दी उसळली होती. लॉकडाऊनच्या काळात असा कार्यक्रम आयोजित केल्याने केचे यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.

सध्या कोरोना व्हायरसमुळे राज्यात कलम 144 लागू आहे तसेच सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र वर्धा जिल्ह्यातील आर्वीचे भाजपा आमदार दादाराव केचे यांनी, आज आपल्या वाढदिवशी धान्यवाटप जाहीर केल्याने प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. एकीकडे तबलीगी जमातच्या कार्यक्रमामुळे कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढलेली संख्या पाहता संपूर्ण देशाचे धाबे दणाणले असताना, एका जनप्रतिनिधीच्या अशा वागण्याने संताप व्यक्त होत आहे. उपक्रम राबविण्यात तत्पर म्हणून ओळख असणाऱ्या आमदार केचे यांचा आजचा उपक्रम त्यांच्या चांगलाच अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत. (हेही वाचा: सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे COVID19 चा प्रसार वाढू शकतो असे नमूद करणारी सुचनावली ICMR यांच्याकडून जारी)

काल, शनिवारी गावात दवंडी पिटवून केचे आपल्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे आज सकाळपासून केचे यांच्या घरासमोर गर्दी जमायला सुरुवात झाली ब बघता बघता ही गर्दी प्रचंड वाढली. देशात सध्या कोरोना विषाणूची भीती असताना केचे यांनी जमवलेली ही गर्दी पाहून, एका व्यक्तीने पोलिसांना याची कल्पना दिली. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब हा प्रकार थांबवत गर्दी पांगवली. सध्या धान्यवाटप बंद करून केचेंच्या घराला लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची पूर्व परवानगी घेतली नसल्याने आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या या कार्यक्रमाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत ते पाहून केचे यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.