Maha Govt Reduces Security of Raj Thackeray:  राज ठाकरे यांची सुरक्षा काढून घेणे हे सरकारचे घाणेरडे राजकारण आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Pramod Patil, Raj Thackeray (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह अनेक नेत्यांच्या झेड सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi) घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'राज ठाकरे यांची सुरक्षा काढून घेणे हे महाविकास आघाडी सरकारचे घाणेरडे राजकारण आहे. तसेच राज ठाकरे यांना कुठल्याही सुरक्षेची गरज नाही, त्यांच्या सुरक्षेसाठी मनसेसैनिक खंबीर आहेत', अशा शब्दांत राजू पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

सत्तेत आलेले सरकार गेल्या काही वर्षांपासून विरोधकांचे नगरसेवक पळवत आहे. आता हा ट्रेंड झालाच आहे. सत्तेत आल्यानंतर प्रत्येकजण आपल्या पॉवरचा गैरवापर करत आहे. मात्र, आता राजकारणाचा हा पॅटर्न बदलला गेला पाहिजे. जे बेडूक उड्या मारतात त्यांना घरी बसवले पाहिजे, त्याशिवाय हे थांबणार नाही. तसेच नवी मुंबई महापालिकेत भाजपा सोबत युतीचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही. जर असा कोणता प्रस्ताव आला तर, त्या युती संदर्भातील निर्णय हे राज ठाकरे घेतील. आम्ही सर्व जागा लढवण्याची तयारी केली असून त्याप्रमाणे कामाला देखील लागलो आहोत, असेही राजू पाटील म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Maharashtra Government Decision: राज ठाकरे यांची झेड सुरक्षा, देवेंद्र फडणवीस यांची बुलेटप्रूफ गाडी हटवली, चंद्रकांत पाटील , प्रसाद लाड यांच्या सुरक्षेतही कपात

राज्य सरकारने घेतलेल्या सुरक्षेत कपात करण्याच्या निर्णयावरून त्यांच्यावर टीकाही होऊ लागली आहे. यावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरेक्षेत मोठी कपात केल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस यांच्याबरोबरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेतही सरकारकडून कपात करण्यात आली आहे. ज्यामुळे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरु झाली आहे.