Raj Thackeray, Devendra Fadnavis, Chandrakant Patil | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी ( Maha Vikas Aghadi) सरकारने राज्यातील विविध नेते आणि व्यक्तिमत्वांच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची झेड सुरक्षा (Z Security) हटवली आहे. तर विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची बुलेटप्रुफ गाडी ( Bulletproof Vehicle) काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), प्रसाद लाड (Prasad Lad0 यांची विशेष सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध व्यक्तिंना देण्यात आलेल्या सुरक्षेबाबतचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयात काहींची सुरक्षा कमी करण्यात आली तर काहींची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.  राज्यातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाबाबत आता विरोधी पक्ष काय प्रतिक्रिया देतो याबाबत उत्सुकता आहे.

अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेतही कपात

देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मुलगी दिवीजा फडणवीस यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.  अमृता फडणवीस यांना पूर्वी वाय दर्जाची सुरक्षा होती. आता त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे नेते रामदास आठवले, भाजप आमदार आशिष शेलार, दिपक केसरकर यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला अॅड. उज्ज्वल निकम आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे.

सुरक्षा रद्द करण्यात आलेले आणखी काही नेते

  • अंबरीशराव अत्राम
  • चंद्रकांत पाटील
  • संजय बनसोडे
  • सुधीर मुनगंटीवार
  • नारायण राणे
  • रावसाहेब दानवे
  • राजकुमार बडोले
  • हरिभाऊ बागडे
  • राम कदम
  • प्रसाद लाड
  • मोरोतराव कोवासे
  • शोभाताई फडणवीस
  • कृपाशंकर सिंह
  • माधव भंडारी

राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिका आणि वक्तव्यांमुळे या आधी अनेकदा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे नेहमीच ते टीकाकारांच्या रडारवर राहिले आहेत. मनसेने केलेली विविध आंदोलने आणि त्यांची भूमिका पाहता राज ठाकरे यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात आली होती. परंतू, आता ही सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयावर मनसे काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे. (हेही वाचा, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांना झेड दर्जाची सुरक्षा, सचिन तेंडुलकर यांची सुरक्षा घटवली, महाराष्ट्र सरकारचा निर्णय)

दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांच्या जीवितालाधोका असल्याचा अहवाल मुंबई पोलिसांनी राज्य सरकारला दिल्याचे समजते. या अहवालात देवेंद्र फडणवीस यांना नक्षलवाद्यांकडून तसेच इतरही अनेक बाजूंनी धोका असल्याचे म्हटले होते. राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनीसुद्धा फडणवीस यांची सुरक्षा कमी करु नये असे म्हटल्याचे समजते. मात्र, आता जैस्वाल यांचीच बदली होत आहे. या बदलीनंतर राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.