Allegations Against Sameer Wankhede: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला केंद्रीय एजन्सीच्या विशेष तपास पथकाने अंमली पदार्थ प्रकरणी शुक्रवारी क्लीन चिट दिली. त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनचे माजी संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) चांगलेच चर्चेत आले आहेत. आर्यन खानला अटक करणाऱ्या समीर वानखेडेवर कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
एनसीबीने आरोपपत्रात आर्यन खानच्या नावाचा समावेश केलेला नाही. तसेच वानखेडे यांच्या तपासादरम्यान कोणतीही वैद्यकीय तपासणी व व्हिडिओग्राफी करण्यात आलेली नाही. IRS अधिकारी समीर वानखेडे यांचा NCB मधील कार्यकाळ 31 डिसेंबर 2021 रोजी संपला. त्याला वादांचा मोठा इतिहास आहे. महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत अनेक दावे केले होते. समीर वानखेडे यांच्यावर आतापर्यंत खालील आरोप करण्यात आहे आहेत. (हेही वाचा -Drugs on Cruise Case: Aryan Khan प्रकरणाचा तपास करणारे NCB अधिकारी Sameer Wankhede यांच्यावर केंद्राकडून कारवाईची शक्यता)
बनावट SC प्रमाणपत्र -
समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून अनुसूचित जातीसाठी राखीव पद मिळवले, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.
बनावट धर्म -
वानखेडे यांनी केवळ जात प्रमाणपत्रच बनावट नाही, तर त्यांचा धर्मही बनावट असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. समीर वानखेडे यांच्या शबाना कुरेशीसोबतच्या पहिल्या लग्नाचे छायाचित्र सार्वजनिक करताना महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा केला. त्यांच्या वडिलांचे खरे नाव ज्ञानदेव दाऊद वानखेडे आहे, असाही दावा करण्यात आला.
बारचा मालक -
नवाब मलिक यांनी आरोप केला आहे की, वानखेडे हे नवी मुंबईतील एका बारचे मालक आहेत. त्यांनी केवळ 17 वर्षांचे असताना बारचा परवाना घेतला होता.
खंडणीसाठी बनावट छापे -
खंडणी वसूल करण्यासाठी बनावट साक्षीदारांची व्यवस्था करून बनावट छापे टाकल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आला होता. आर्यन खान प्रकरणातही असाच आरोप झाला होता.
समीर वानखेडे आता कुठे आहे?
समीर वानखेडे यांनी NCB मध्ये त्यांचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी केली नाही. ते मूळत: जेथे नियुक्त होते त्या महसूल गुप्तचर संचालनालयात परत गेले आहेत. एनसीबीने आर्यन खानला क्लीन चिट दिल्यानंतर वानखेडे म्हणाले की, मी यापुढे एनसीबीचा भाग नसल्यामुळे या विषयावर भाष्य करणार नाही.