Pravin Darekar | Photo Credits: Twitter/ ANI

औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नाव संभाजीनगर (Sambhaji Nagar) करण्याच्या मुद्द्यावरुन सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यात शिवसेनेने नामांतराचा मुद्दा उचलून धरला असून अन्य पक्षांनी नामांतराला विरोध दर्शवला आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार,  नामांतराच्या मुद्द्याला विरोध दर्शवून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी नाव बदलल्याने शहरांच्या विकासात फरक पडत नाही. मात्र औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असं नामकरणं करणं ही अस्मितेची बाब आहे, असे सांगितले आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

"आम्ही हा विषय बसून सोडवू असं शिवसेनेचे खासादर संजय राऊत म्हणतात आणि त्याचवेळी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे विरोध केल्यास जशाच तसे उत्तर देऊ अशी भूमिका मांडत आहेत. तसेच मुस्लिम समाज आमच्या पाठीशी असल्याचे महाविकास आघाडीमधील नेते मंडळी म्हणत असल्याने या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे येऊन बोलण्याची गरज आहे", असेही दरेकर यावेळी म्हणाले.हेदेखील वाचा- औरंगाबादचे संभाजीनगर नामांतराला विरोध करणा-यांना खरी शिवसेना दाखवून देऊ- चंद्रकांत खैरे

त्याचबरोबर "औरंगाबाद शहराच्या नामकरणाबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी, धरसोड करणारी आहे. काँग्रेस नेते शिवसेनेच्या भूमिकेला विरोध करत आहेत. शिवसेनेला अस्मिता हवी का सरकार हवं हे ठरवावं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात, नेते संजय निरुपम, मंत्री अशोक चव्हाण यांनी देखील शिवसेनेच्या भूमिकेला विरोध केला आहे. त्यामुळे शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी" असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबाद नामांतरावरून निर्माण झालेल्या वादावर आमच्या तिन्ही पक्षांचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी हे एकत्र बसून मार्ग काढतील. मात्र, यामध्ये काही लोक जाणीवपूर्वक महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अंतर पडावे, यासाठी प्रश्न निर्माण करत आहेत, असे अजित पवार म्हणाले आहेत.