BMC Commissioner Iqbal Chahal (Photo Credits: BMC Twitter)

महाराष्ट्रासह मुंबईत (Mumbai) कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांसह मुंबईत कोरोनाचे नियम कडक करण्यात आले आहे. तसेच काही जिल्ह्यात अंशत: लॉकडाऊन देखील ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतही लॉकडाऊन होणार की काय असे प्रश्न अनेकांना पडत आहे. त्यावर आज मुंबई महानगरपालिकेचे (BMC) आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी 'मुंबईत सध्यातरी तातडीने लॉकडाऊन लादण्याची गरज नाही', असे म्हटले आहे. मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी माहिती दिली.

मुंबईत कोरोनाची सद्य स्थिती पाहता अजूनही मुंबईची स्थिती हाताबाहेर गेलेली नाही. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे तातडीने लॉकडाऊनची गरज नाही अशी माहिरी इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.हेदेखील वाचा- महाशिवरात्री निमित्त जेजुरीत 10 ते 12 मार्चपर्यंत जमावबंदी; कोकणातील कुणकेश्वर मंदिरही बंद

तसेच मुंबईकरांना जर कोरोनाच्या नियमांचा गांभीर्याने विचार केला नाही आणि कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली तर भविष्यात आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागू शकतील, अशा इशाराही महापालिका आयुक्तांनी दिली आहे.

मुंबईत कालपर्यंत (8 मार्च) बरे झालेल्या रुग्णांचा दर 93% झाला आहे. मुंबईतील कोविड चाचण्यांची संख्या वाढल्याने पॉझिटिव्ह केसेसमध्ये वाढ झाली आहे. काल (8 फेब्रुवारी) 23000 कोविड 19 चाचण्या करण्यात आल्या. याआधी म्हणजे जानेवारीपर्यंत 10 ते 12 हजारच चाचण्या केल्या जात होत्या. त्या चाचण्या आता सातत्याने वाढवण्यात येत आहेत.

मुंबई शहरात काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1008 जणांना कोरोना व्हायरस संक्रमण झाले. तर 956 जणांना डिस्चार्ज मिळाला. संपूर्ण दिवसात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4 इतकी असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. दरम्यान, ही माहिती देताना मुंबई महापालिकेने म्हटले आहे की, मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांपैकी 3 रुग्ण पुरुष तर एक महिला रुग्ण होती.