
केंद्रात गेल्या 8 वर्षांत मोदी सरकार (Central Government) आल्यानंतर भ्रष्टाचार पूर्णपणे संपला आहे, असे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) म्हणाले. जिल्हा परिषदेच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ पुण्यात (Pune) आयोजित मेळाव्याला संबोधित करताना कोश्यारी म्हणाले की, पंतप्रधान मोदींना जनतेच्या सहकार्याने देशातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करायचे आहे.
कोश्यारी म्हणाले, 'देशातील मोदी सरकारला आठ वर्षे झाली आहेत. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्रीय पातळीवर भ्रष्टाचार झाल्याचे कधी ऐकले आहे का? काही राज्यांमध्ये अधिकारी लेखी देतात की, नेते त्यांच्याकडून लाच मागतात. हे देशाचे दुर्दैव आहे. पण केंद्रातील कोणत्याही मंत्र्याने किंवा पंतप्रधानांनी भ्रष्टाचार केल्याचे ऐकले आहे का?’
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर टीका केली. यावर कोश्यारी म्हणाले की, पंतप्रधान मोदींना देशातून भ्रष्टाचार उखडून टाकायचा आहे आणि त्यासाठी नागरिकांच्या पाठिंब्याची गरज आहे. कोश्यारी पुढे म्हणाले, येत्या 25 वर्षांत भारताला 'विश्वगुरू' बनवण्यासाठी प्रत्येकाने कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि देशाप्रती 'समर्पणाची' भावना आत्मसात केली पाहिजे. (हेही वाचा: Ajit Pawar On PM Modi: पंतप्रधान मोदींच्या घराणेशाहीच्या टीकेला अजित पवारांचं प्रत्त्युत्तर)
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सांगितले की, त्यांच्या सरकारचे प्राधान्य हे सर्वसामान्यांसाठी काम करणे आणि इतर मागासवर्गीय, मराठा आणि धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध असणे हे आहे. मंत्रालयात राष्ट्रध्वज फडकावल्यानंतर देशाच्या 76 व्या स्वातंत्र्यदिनी बोलताना शिंदे म्हणाले, 'आम्ही ओबीसी, मराठा आणि धनकर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध आहोत. बंठिया आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने मान्य केल्याने ओबीसी समाजाला दिलासा मिळाला आहे.’