Jitendra Awhad (Photo Credits: Pixabay Facebook)

महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढली असून नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेण्याचे आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची गरज आहे. यातच वाढत्या रुग्णांमुळे रक्ताची कमतरताही तीव्र जाणवत आहे. महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा (Blood Shortage) पडला असून अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड  (Jitendra Awhad) यांनी केले आहे. ट्विटच्या माध्यमातून त्यांनी तमाम जनतेला तसेच युवकांना पुढे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रात रक्तवाहिन्या कोरड्या पडल्या आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.

'महाराष्ट्रात पुढील 7 ते 8 दिवस रक्त पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन रक्तदान करावे ही काळाची नितांत गरज आहे. तसेच युवकांनी स्वेच्छेने आणि नि:स्वार्थपणे होऊन रक्तदान करावे' असे जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.हेदेखील वाचा- Covid-19 Vaccination in Maharashtra: लसीकरणाला वेग देण्यासाठी दररोज तीन लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दीष्ट- राजेश टोपे

महाराष्ट्रात काल (1 एप्रिल) 43,183 नव्या कोरोना रुग्णांची मोठी वाढ झाली असून 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 32,641 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 28 लाख 56 हजार 163 वर पोहोचली असून 54,898 जण मृत्यूमुखी पडली आहे. सद्य घडीला राज्यात 3 लाख 66 हजार 533 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान मुंबईत काल 50 हजार नागरिकांना लस देण्यात आली असून राज्यात एकूण 65 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोरोना लसीकरणात महाराष्ट्र राज्य सुरुवातीपासूनच अग्रेसर होते आणि त्यात सातत्य राखल्याचेही टोपे यांनी सांगितले. दररोज 3 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे राज्य सरकारचे उद्दीष्ट असून सध्या दररोज किमान पावणे तीन लाख नागरिकांना लस देण्यात येत आहे.