Coronavirus Vaccine Representational Image (Photo Credits: ANI)

राज्यातील कोरोना बाधितांची संख्या (Corona Cases) मोठ्या प्रमाणावर वाढत असताना लसीकरणाचा (Vaccination) वेग वाढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यातच आता दररोज तीन लाख लसी देण्याचे सरकारचे उद्दीष्ट असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आज 3 लाख नागरिकांना लसी देऊन महाराष्ट्राचे उच्चांक गाठला असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, यापेक्षाही दुप्पट वेगाने लसीकरण करण्याचे उद्दीष्ट गाठण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ट्विटच्या माध्यमातून आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.

मुंबईत आज 50 हजार नागरिकांना लस देण्यात आली असून राज्यात एकूण 65 लाखांहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. कोरोना लसीकरणात महाराष्ट्र राज्य सुरुवातीपासूनच अग्रेसर होते आणि त्यात सातत्य राखल्याचेही टोपे यांनी सांगितले. दररोज 3 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याचे राज्य सरकारचे उद्दीष्ट असून सध्या दररोज किमान पावणे तीन लाख नागरिकांना लस देण्यात येत आहे. मात्र आज तब्बल 3 लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे.

राजेश टोपे ट्विट्स:

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली ही माहिती नक्कीच दिलासादायक आहे. सध्या मुंबई आणि एकूण राज्यातील रुग्णवाढ पाहता लसीकरणाला वेग येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेष म्हणजे आजपासून 45 वर्षांवरील सर्वांना लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून या महिन्यात सुट्टीच्या दिवशीही लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

दरम्यान, आज राज्यात 43,183 नव्या कोरोना रुग्णांची मोठी वाढ झाली असून 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईत 8646 नव्या रुग्णांसह 18 मृतांची नोंद झाली आहे.