मुंबई: हॉटेलमधील थकलेली उधारी मागीतली म्हणून दोघा भावंडांकडून मालकाची धारदार शस्त्राने हत्या; आरोपी विरोधात गुन्हा दाखल
Murder (Photo Credit - File Photo)

मुंबईतील (Mumbai) अंधेरी (Andheri) उपनगरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेल मालकाने (Hotel Owner) थकलेली उधारी मागितली म्हणून दोन भावडांनी मालकाची धारदार शस्त्राने हत्या (Murder) केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अंधेरी पूर्वेकडील नित्यानंद गॅरेजजवळ ही घटना घडली. पोलिस या आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरिफ अन्सारी असे मृत हॉटेल मालकाचे नाव आहे. दरम्यान, अंधेरीतील साकीनाका येथे आरिफ आणि त्याचा मोठा भाऊ हॉटेलचा व्यवसाय करत होते. रविवारी रात्री आरोपी विपुल सोलंकी आरिफच्या हॉटेलमध्ये आला आणि त्याने जेवणाची ऑर्डर दिली. मात्र, हॉटेल मालकाने त्याला आधीची उधारी देण्यास सांगितले. उधारी दिली नाही तर जेवणाची ऑर्डर घेणार नाही, असंही म्हटलं.

यानंतर विपुल सोलंकीने आपला मोठा भाऊ प्रकाश सोलंकीला संबंधित हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर या दोघांनी हॉटेल मालकाला बाहेर नत त्याला हाणमार करण्यास सुरुवात केली. या वादात प्रकाश सोलंकीने हॉटेल मालकावर चाकूने वार केले. यात हॉटेल मालक अन्सारी गंभीर जखमी झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला. (वाचा - Mumbai: विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी सासूची हत्या; सूनेसह प्रियकराला अटक)

दरम्यान, अन्सारीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला. अन्सारीच्या कुटुंबियांनी यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी प्रकाश आणि विपुल सोलंकी यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर प्रकाश आणि विपुलने घटनास्थळावरून पळ काढला होता. त्यानंतर ते फरार झाले होते. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

मुंबईतील बोरीवली परिसरात दोन दिवसांपूर्वी एका 57 वर्षीय महिलेचा मृतदेह घरात आढळून आला होता. विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी सूनेने सासूची हत्या केली होती. सूनेने आपल्या प्रियकराच्या मदतीने सासूची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी सून आणि प्रियकराला अटक केली होती.