निसर्ग चक्रीवादळाने (Cyclone Nisarga) संपूर्ण महाराष्ट्रातील (Maharashtra) नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका रायगड जिल्ह्यातील नागरिकांना बसला आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याचे समजत आहे. यातच कोकण किनारपट्टीला धडकलेल्या निसर्ग वादळाचा तडाखा नवी मुंबई (Navi Mumbai) शहालाही बसला आहे. नवी मुंबई येथे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सीबीडी बेलापूर (CBD Belapur) विभागातल्या दुर्गामाता संभाजीनगरमध्ये (Durgamata Sambhaji Nagar) डोंगराशी पायथ्याशी वसलेल्या झोपडपट्टीतील 66 नागरिकांना शाळा क्रमांक 4 मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच इतर परिसरातील डोंगराच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ हलवण्याचे आदेश महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी प्रशासनाला दिले आहे.
नवी मुंबई शहरात ताशी 90 ते 100 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहे. दरम्यान, नवी मुंबई परिसरातील आतापर्यंत 33 मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. यामुळे काही वाहने आणि सुरक्षा भिंतीचे नुकसान झाले आहे. रस्त्यावर कोसळून पडलेल्या झाडांमुळे अत्यावश्यक सेवांमध्ये अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या अग्निशमन दलाकडून रस्त्यावर कोसळली झाले बाजूला करण्याचे काम सुरु आहे. हे देखील वाचा- रायगड जिल्ह्यातील काही भागात मोबाईल नेटवर्क सेवा विस्कळीत; जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची माहिती
ट्वीट-
#नवीमुंबईमध्ये जोरदार वा-यांसोबत पावसाचा जोरही वाढला आहे. #बेलापूर विभागातल्या दुर्गामाता संभाजीनगर मधील ६६ नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव बेलापुर सेक्टर ८ इथल्या शाळा क्रमांक ४ मध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे. आतापर्यंत ३३ मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत.
— AIR News Mumbai, घरीच रहा, सुरक्षित रहा (@airnews_mumbai) June 3, 2020
निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने सतर्क राहात पूर्वतयारी केली आहे. मुंबई महापालिकेचे सर्व विभाग व आपत्कालीन व्यवस्थापन समुह परिस्थतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रीपासून सज्ज आहे. निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीच्या जवळ राहणाऱ्या लोकांना स्थलांतरित करण्याचे काम मुंबई पोलीस आणि महानगर पालिकेतर्फे करण्यात येत आहे.