Shiv Sena leader Aaditya Thackeray (Photo Credits: IANS/File)

कोविड-19 (Covid-19) ची परिस्थिती हाताळत असलेल्या महाराष्ट्र सरकारवर विरोधकांकडून वारंवार टीका होत आहे. पण त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असून कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणणे हे सध्याच्या काळात सरकारचे प्रथम प्राधान्य आहे. इतर गोष्टी दुय्यम आहेत, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ठाण्यात (Thane) पत्रकारांशी बोलताना सांगितले. ठाणे जिल्ह्यातील कोरोना व्हायरसची परिस्थिती आणि स्थानिक प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहाणी करण्यासाठी आदित्य ठाकरे शनिवारी (4 जुलै) संध्याकाळी ठाण्यात दाखल झाले होते.

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आदित्य ठाकरे यांनी कोविड-19 ची परिस्थिती नियंत्रणात आणणे हे सरकार समोरील प्राधान्य असल्याचे सांगितले. कोविड-19 ची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरत आहे या विरोधकांच्या टीकेला तुम्ही काय उत्तर द्याल, असे विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, "त्यांना त्यांचे काम करु द्या. आम्ही आमचे काम करतो. कोविड-19 ची परिस्थिती हाताळणे आणि संसर्गाची साखळी तोडणे हे आमचे प्राधान्य आहे. इतर गोष्टी दुय्यम आहेत." ('कोरोना को भूल गए, राजकारण प्यारा है,' लहान मुलांचा फोटो शेअर करत आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका)

PTI Tweet:

यावेळी आदित्य ठाकरे यांनी ठाणे महानगरपालिकेकडून तयार करण्यात आलेल्या अॅपचे अनावरण देखील केले. TMC कडून तयार करण्यात आलेले हे अॅप हॉस्पिटलमधील बेडची उपलब्धता आणि अॅम्बुलन्स बुकींगसाठी उपयुक्त ठरणार आहे.

दरम्यान ठाण्यात कोरोना व्हायरसचे 45833 रुग्ण असून त्यापैकी 17851 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1254 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे ठाण्यात पुन्हा एकदा 10 दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे.