Pune By-Election: कसबा पेठ, चिंचवड मतदार संघातून भाजपचे उमेदवार ठरले? 1 फेब्रुवारीला होणार उमेदवारांच्या नावाची घोषणा, चंद्रकांत पाटील यांची माहिती
Chandrakant Patil | (Photo Credit: Twitter)

Pune By-Election: कसबा पेठ (Kasba By-Election) आणि चिंचवड (Chinchwad By-Election) मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही जागांवर नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आता या उमेदवाराची निवड येथे दिल्लीतून होणार आहे. भाजप नेते तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दोन्ही जागेवरील उमेदवारांच्या नावांच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. 1 फेब्रुवारीला उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी स्पष्ट केलं आहे.

यासंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची यादी तयार झाली आहे. आम्ही शुक्रवारी ही यादी केंद्रीय समितीकडे पाठवणार आहोत. केंद्रीय समिती 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी रोजी यासदंर्भात बैठक घेईल. त्यानंतर दिल्लीतून उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल. (हेही वाचा - Uddhav Thackeray Thane Visit: 'लोकशाहीत प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे'- उद्धव ठाकरेंच्या ठाणे दौऱ्यावर CM Eknath Shinde यांची प्रतिक्रिया)

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केल्यानंतर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. कसबा आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार होते. दरम्यान त्यांच्या निधनानंतर या ठिकाणी आता पोटनिवडणूक होणार आहे. या जागांसाठी ठाकरे गट उमेदवार देणार का ? या प्रश्नाचं उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं की, 'पिंपरी चिंचवडच्या जागेवर शिवसेना आपला उमेदवार देणार आहे. पण कसबा मतदारसंघाबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबाबत बातचीत करून निर्णय घेतला जाईल.' (हेही वाचा - Maharashtra Politics: राज्यपालांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता का, हे स्पष्ट करावे, राष्ट्रवादीकडून प्रश्न उपस्थित)

दरम्यान, कसबा पेठ आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघात भाजपचे आमदार होते. कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. तर पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचंही नुकतंच निधन झालं. त्यामुळे या दोन्ही मतदार संघात पोटनिवडणूक होणार आहे. आता या दोन्ही मतदारसंघात पुन्हा एकदा भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची शक्यता आहे.