महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ठाण्याचा दौरा केला. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्याला भेट दिली. आता या भेटीवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, ‘प्रत्येकाला आपल्या पक्षाच्या विस्तारासाठी काम करण्याचा अधिकार आहे’
ठाणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राबल्य असलेले क्षेत्र असून शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाण्यात आहेत. उद्धव ठाकरेंच्या या ठाणे भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे यांचे गुरू आनंद दिघे यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरे ठाण्याला असल्याने त्यांचा हा दौरा महत्त्वाचा ठरला आहे. यादरम्यान ठाण्यातील शिवाजी मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एका मेगा मेडिकल कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, त्यानंतर ते टेंभी नाका येथील आनंद आश्रमाजवळील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. यानंतर उद्धव ठाकरे ठाण्यातील जैन समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांचा ठाणे दौरा यशस्वी करण्यासाठी त्यांच्या पक्षाने सर्व शक्ती पणाला लावली आहे. शहरात ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंचे स्वागत करणारे बॅनर व पोस्टर्स लावण्यात आले आहेत. गेल्या वर्षी शिवसेनेत दोन गट पडले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारांनी बंड केल्याने उद्धव सरकार पडले, नंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. (हेही वाचा: Maharashtra Politics: मुंबईबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस व्हीबीएसोबत जागा वाटून घेणार नाही, NCP नेत्याचे वक्तव्य)
ठाणे हे एकनाथ शिंदे यांचे प्रभावक्षेत्र मानले जाते. अशा स्थितीत शिवसेनेतील राजकीय भुकंपानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाण्यात आपला प्रभाव वाढवण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. दुसरीकडे, दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावर टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कधीच गेला असून उद्धव ठाकरे यांनी आता काँग्रेसचा वारसा घेतला आहे, असे ते म्हणाले आहेत.