मिरारोड (Mira Road) परिसर काल (7 डिसेंबर) रात्रीच्या सुमारास गॅस सिलेंडर स्फोटांच्या (Gas Cylinder Blast) मालिकांनी हादरून गेला. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, काल रात्री 2 च्या सुमारास रामनगर येथील शांती गार्डन, सेक्टर नंबर 5 येथे एका मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या सिलेंडरच्या गाडीत एकापाठोपाठ एक असे तब्बल 12 स्फोट झाले. मोकळ्या मैदानात हा स्फोट झाल्याने सुदैवाने या भीषण दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. सिलेंडरच्या गाडीचा पत्रा उडाल्याने एक नागरिक जखमी झाला आहे. त्याला ताबडतोब जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 2 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. रामनगर येथील सेक्टर नंबर 5 येथे मोकळ्या मैदानात ज्या सिलेंडरच्या गाडीत स्फोट झाला त्याच्या बाजूला सिलेंडरने भरलेल्या 2 गाड्या होत्या. त्या दोन्ही गाड्यांना आग लागली. त्यामुळे त्यातील सिलेंडरचे देखील एकामागून एक स्फोट होत गेले. असे तब्बल 12 स्फोट झाले. या घटनेने येथील स्थानिक रहिवासी खडबडून जागे झाले आणि या परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.हेदेखील वाचा- Maharashtra: मुंबईतील लोअर परळ भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत भीषण आग
हा स्फोट इतका तीव्र होता की आजूबाजूला असलेल्या काही घरांच्या काचा देखील फुटल्या. सिलेंडरचा पत्रा तसेच गाडीचा पत्रा हा बाजूच्या सोसायटीच्या आवारात पडला होता.
स्फोटानंतर लगेच मीरा भाईंदर अग्निशमन दलाच्या सात अग्निशमन गाड्या, दोन टॅंकर, एक टिटीएल गाडी, तसेच 54 जवान घटनास्थळी दाखल झाले. आणि तीनच्या दरम्यान त्यांनी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली. उशीरापर्यंत ट्रकमधील लिकेज सिलेंडर शोधण्याचे काम सुरु होते.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती जागा आरक्षित असल्याने पूर्णपणे मोकळी होती. तेथे नेहमी भरलेल्या सिलेंडरच्या गाड्या लागत होत्या तसेच आजूबाजूला इतर वाहनं देखील पार्किंग करत असतात. तसेच काही नागरीकांनी येथे अवैध सिलेंडरची रिफिलिंग होत असल्याचाही आरोप केला आहे.