Devendra Fadnavis | (Photo Credits: Facebook)

लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात थिणगी पडली आहे. दरम्यान, वीज थकबाकीची देणी मागील फडणवीस सरकारने आमच्या माथी मारली आहे, असे उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले होते. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) पलटूराम सरकार आहे. उर्जा मंत्र्यांनी स्वतः घोषणा करत वाढीव वीज बिले कमी करु, असे जाहीर केले होते. तिन्ही पक्षांचे कॅबिनेट मीडियासमोर आले त्यांनी वाढीव वीज बिले कमी करु, अशी घोषणा करत फोटोही काढून घेतले. मात्र, आता सगळ्यांनी पलटी मारली, अशीही टीका फडणवीस यांनी केली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी भाजप उमेदवार संदीप जोशी यांचा प्रचार करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पदवीधर मेळाव्यात आले होते. दरम्यान, ते म्हणाले की उर्जा मंत्री आता म्हणत आहेत की, माझा अभ्यास नव्हता. महावितरणची 59 हजार कोटींची थकबाकी आहे, याबाबत मला काही माहिती नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या वर्षाभरात विदर्भात फिरकलेदेखील नाहीत. महाराष्ट्राचे सध्याचे सरकार हे विदर्भ, मराठवाड्यासाठी, उत्तर महाराष्ट्र, कोकण यांच्यासाठी काम करणारे सरकार नाही. मुख्यमंत्री एका भागासाठी काम करतात आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या भागासाठी काम करतात. पण महाराष्ट्रात काम कोण करणार? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. या सरकारमधला कोणताही मंत्री येतो आणि घोषणा करतो. मात्र, जनतेचे कोणतेही काम पूर्ण केले जात नाही. राज्यात केवळ बदल्याचे प्रकार चालवले जात आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. हे देखील वाचा- भाजपला आंदोलन करायचे असेल तर, त्यांनी केंद्र सरकारविरोधात करावे; वाढीव वीज बिलांवरून उर्जामंत्री नितीन राऊत यांचा टोला

वाढीव वीज बिल माफीवरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप तसेच मनसेदेखील आक्रमक झाल्याने राज्य सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. महावितरणच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढलेला असताना सर्वसामान्य ग्राहकांना वीजबिल माफी कशी द्यावी, अशा विवंचनेत असलेले उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.