त्रिपक्षीय महाविकास आघाडी (MVA) हे महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य आहे आणि भाजप आणि सेनेच्या पुनर्मिलनाची ‘टेबलाखालून’ डील असल्याच्या भाकितांमध्ये तथ्य नाही, असे प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी रविवारी केले. पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामधील 'रोखठोक' या साप्ताहिक स्तंभात राऊत म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री आणि सेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारी रोजी शिवसैनिकांना संबोधित करताना त्यांच्या आजारपणाबद्दल त्यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपवर टीकास्त्र सोडले होते. भाजपबाबत त्यांनी ठाम भूमिका मांडली. त्यांच्या भाषणातून महाविकास आघाडी हेच महाराष्ट्राचे भवितव्य आल्याचा संदेश मिळाला.
ते पुढे म्हणतात, भाजपच्या ढोंगीपणाचे, नकली हिंदुत्वाचे उद्धव ठाकरे यांनी वाभाडे काढले. भाजपसोबतच्या युतीमध्ये शिवसेनेची वाढ झाली नाही. युतीमध्ये आम्ही सडलो असे विधान ठाकरे यांनी केलेयाने भाजप-शिवसेनेमध्ये भांडण सुरु झाले. पुढे त्यांनी भाजपविना शिवसेना एकटी लढल्याचे नमूद केले. ठाकरे यांचे भाषण आणि त्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया यामुळे राज्याचे राजकारण स्पष्ट झाले असून गोंधळाला जागा नाही, असे ते म्हणाले. फडणवीस यांच्या प्रतिक्रियेनंतर शिवसेना-भाजपची पुन्हा युती होण्याची शक्यता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपमुळेच शिवसेना राजकीयदृष्ट्या वाढल्याचा दावा करणाऱ्या माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधत राऊत म्हणाले की, सेना 1966 मध्ये आणि भाजपची स्थापना 1980 मध्ये झाली. त्यामुळे भाजपच्या मदतीने शिवसेना वाढली यात काही तथ्य नाही. कोण कोणाच्या आधी जन्मास आले यापेक्षा जन्मास येऊन काय दिवे लावले? हा प्रश्न महत्त्वाचा आहे, असा हल्ला त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर चढवला.
पुढे त्यांनी बाबरी पाडल्यानंतर उत्तर हिंदुस्थानातील निवडणुकीबाबत भाष्य केले. ते म्हणाले, ‘शिवसेनेने 180 जागा लढवल्या व सगळ्यांचे डिपॉझिट गेले असे ते म्हणाले. त्यात तथ्य नाही. शिवसेनेने कोठेही अधिकृत उमेदवार उभे केले नव्हते. त्यांना पक्षाचे अधिकृत चिन्ह नव्हते. बाबरी प्रकरणी सीबीआय विशेष न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी बाळासाहेब लखनौला गेले तेव्हा लखनौचे रस्ते बाळासाहेबांच्या स्वागतासाठी गच्च भरले होते. संपूर्ण उत्तर प्रदेशला त्या दिवशी एक 'करंट' लागला होता. बाळासाहेब ठाकरे यांचे त्या दिवशी लखनौला जे स्वागत झाले ते अभूतपूर्व होते. पण या सगळय़ाचे राजकारण बाळासाहेब ठाकरे यांनी केले नाही.’ (हेही वाचा: महाराष्ट्रातील 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय घटनाबाह्य, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया)
शेवटी ते म्हणतात, श्री. नरेंद्र मोदी यांच्या भोवती व्यापाऱ्यांची भिंत आहे. मोदी यांनी भारतीय राजकारणाचा एक 'इव्हेंट' केला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला झळाळी आली हे खरेच. मोदी यांचे राजकारण उत्सवी स्वरूपाचे आहे. जगभरात राजकारणाचा असा उत्सव कधीच कोणी केला नसेल. हिंदुत्ववादी शिवसेनेचे महत्त्व कमी करायचे व अधिकार संपवायचे हे धोरण राबवणारेच भाजपचे आज सूत्रधार आहेत. महाराष्ट्रातील सत्ता त्यांनी गमावली आहे. पण राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांचा गोळीबार सुरू आहे. आता त्यांना मुंबईवर कब्जा मिळवायचा आहे.’