Mumbai Local (PC - PTI)

Mumbai Local Train for All: कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्यापासून बंद करण्यात आलेली मुंबईतील लोकल सेवा (Mumbai Local Service) पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सर्वसामान्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) रेल्वे मंत्रालयाला (Ministry of Railways) पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे राज्य सरकार करोनासंबंधित सर्व नियमांचं पालन करत लोकल सेवा पुन्हा सुरु करण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने रेल्वे मंत्रालयाला पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटंल आहे की, लोकल प्रवासासाठी प्रवाशांना दिवसभरात तीन टप्प्यांत प्रवासाची मुभा देण्यात यावी. याशिवाय पत्रात प्रवासासाठीच्या वेळादेखील निर्धारित करण्यात आल्या आहेत. या वेळानुसार, सकाळी 7.30 वाजल्यापासून सर्वसामान्यांना प्रवासाची मुभा द्या, सकाळी 8 ते 10:30 वाजल्याच्या दरम्यान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु ठेवा. तसेच सकाळी 11 ते दुपारी 4.30 या वेळेत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची मुभा द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय अत्यावश्यक सेवेतील प्रवासी ज्यांच्याकडे अधिकृत क्यूआर कोड तसेच ओळखपत्रासोबत अधिकृत तिकीट किंवा मासिक पास आहे, अशा प्रवाशांना सकाळी 8 ते 10.30 तसेच संध्याकाळी 5 ते 7.30 च्या दरम्यान प्रवासाची परवानगी द्या, असंदी पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. (हेही वाचा -  MSRTC Extra Rounds Of Buses: एसटी महामंडळ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 11 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत बसेसच्या दररोज 1 हजार जादा फेऱ्या वाढवणार)

यापूर्वी मिशन बिगीन अंतर्गंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर सर्व महिला, वकिल यांना लोकलमधून प्रवासाची मुभा देण्यात आली. मात्र, सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा कधी सुरू होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, आज राज्य सरकारने सर्वसामान्य प्रवाशांचं गाऱ्हाण रेल्वे मंत्रालयाकडे पत्राद्वारे मांडलं आहे.

राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात लोकलमध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व नियमांचे पालन करण्यात येईल, असा विश्वासदेखील व्यक्त केला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर रेल्वे मंत्रालयाने लवकरात-लवकर निर्णय द्यावा, अशी विनंतीदेखील केली आहे.