धक्कादायक! अनैतिक संबंधामुळे संसार उध्वस्त; प्रेमात मेव्हणीने विश्वासघात केल्याने तीन मुलांना विष देऊन तरुणाने केली आत्महत्या
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

सोलापूर: सुखात चाललेल्या संसाराची अनैतिक संबंधामुळे राखरांगोळी झाल्याची घटना सोलापूर येथे घडली आहे. मेव्हणीने प्रेमात दगा दिल्याच्या रागातून एका व्यक्तीने आपल्या तीन मुलांना विष देऊन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोलापुरातील माढा तालुक्यातील बेंबळे येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याच गावात या व्यक्तीची मेव्हणी राहत होती. रवींद्र प्रभाकर लोखंडे (रा. वडापुरी, ता. इंदापूर, जि. पुणे) असे या तरुणाचे नाव असून तो 35 वर्षांचा आहे. घडलेय प्रकामध्ये रवींद्रस आजिंक्य (वय 9) व आयुष (वय 6) या मुलांचा मृत्यू झाला आहे. तर मोठी मुलगी अनुष्का (वय 11) हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मृत रवींद्र लोखंडे, पत्नी दुर्गा आणि तीन मुले यांचा सुखाने संसार चालू होता. वडापुरी (ता. इंदापूर) येथे रवींद्र रंगकाम करायचा. मात्र विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ते खोटे नाही. रवींद्रचे आपल्या मेव्हणीसोबत सुत जुळले. या दोघांमध्ये अनैतिक प्रेमसंबंध सुरु झाले. मात्र नंतर मेव्हणीने हे संबंध तोडले. याच रागातून रवीद्र लोखंडे आपल्या तिन्ही मुलांसोबत बेंबळे गावात मेव्हणीकडे आला होता. मेव्हणीच्या घराला कुलूप आहे हे पाहून त्याने कोल्डड्रिंक आणि भजी यांमधून मुलांना विष दिले व स्वतः जवळच्या झाडाला फास घेतला. स्थानिक गावकऱ्यांनी हे पाहिले व तातडीने मुलाला रुग्णालयात दाखल केले. (हेही वाचा: सोलापूर: दिवाळीत माहेरी आलेल्या विवाहितेचा एकतर्फी प्रेमातून खून)

मात्र तोपर्यंत दोन मुलांचा मृत्यू झाला होता. रवींद्रच्या खिशामध्ये एक चिट्ठी सापडली त्यामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख होता. तसेच घडल्या प्रकाराला आपली मेव्हणी, सुनीता कांबळे हीच जबाबदार आहे असेही लिहिले होते. सध्या सुनिता फरार आहे. यातून वाचलेली मुलगी अनुष्का हिच्यावर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. टेंभुर्णी पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.