Pune: कुत्र्याला पोत्यात टाकून जिवंत जाळलं; पुण्यातील पिंपलेगुरव भागातील संतापजनक घटना
Street Dogs Representative Image (Photo Credits-Facebook)

Pune: पुण्यातील पिंपलेगुरव भागात अतिशय संतापजनक घटना घडली आहे. अज्ञात व्यक्तीने कुत्र्याला पोत्यात टाकून जिवंत जाळलं असून या ठिकाणी दोन कावळेदेखील मृतावस्थेत आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) मध्ये एका पाळीव कुत्र्याला चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाचं आता कुत्र्याला पोत्यात घालून जाळल्याची बाब समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृत कुत्र्याचे शव शवविच्छेदनासाठी पाठवले. हा सर्व प्रकार नेमकी कोणी केल्या याचा तपास पोलिस करत आहेत. पिंपलेगुरव भागात राहणाऱ्या विनोद मुरार नावाच्या व्यक्तीने हा सर्व प्रकार उघडकीस आणला.

प्राप्त माहितीनुसार, विनोद मुरार यांचा पाळीव कुत्रा बाहेर फिरून घरात आला. त्यावेळी त्याच्या तोंडाला फेस आला आणि काही वेळात त्याचा मृत्यू झाला. हे कशामुळे घडलं याचा तपास लावण्यासाठी विनोद यांनी घराबाहेर शोधाशोध सुरू केली. यावेळी त्यांना एक कुत्रा पोत्यात टाकून जाळल्याचे आढळून आले. तसेच एका कुत्र्याचा जखमी अवस्थेत मृत्यू झाल्याचे दिसले. विनोद यांना या ठिकाणी 2 कावळेही मृतावस्थेत आढळून आले. हा सर्व प्रकार पाहून विनोद यांना धक्का बसला आणि त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. (वाचा - Sanitizer Blast in Kolhapur: कोल्हापूरमध्ये कचरा जाळताना सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट; महिलेचा होरपळून मृत्यू)

या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुत्र्यांचे शव शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. कुत्र्यांच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा होईल. या कुत्र्यांवर विषप्रयोग केला असावा, असा अंदाज लावला जात आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड मध्ये कुत्र्याला चौथ्या मजल्यावरून फेकून दिल्याची घटना घडली होती. या प्रकरणाची पोलिसांनी योग्य दखल घेतली होती. या घटनेला काही दिवस उलटले नाहीत तर पिंपलेगुरवमध्ये कुत्र्याला जाळून टाकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पिंपलेगुरव परिसरात खळबळ उडाली आहे.