Coronavirus Outbreak: महाराष्ट्रात 55 नव्या कोरोना प्रकरणांची नोंद; राज्यातील कोरोना बाधितांची  संख्या 690 वर पोहचली
Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: PTI)

Coronavirus Outbreak: महाराष्ट्रात (Maharashtra) 55 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 690 वर पोहचली आहे. आज मुंबईत 29, पुण्यात 17, पिंपरी-चिंचवड 4, अहमदनगर 3, औरंगाबादमध्ये 2 रुग्णांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच आतापर्यंत 56 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी माहिती दिली आहे.

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोना रुग्ण मुंबईत सापडले आहेत. मुंबई शहरात आज दिवसभरात 29 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच आज पुण्यात सकाळपासून 3 कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यात आतापर्यंत 5 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. (हेही वाचा - Coronavirus: भारतात गेल्या 12 तासांत कोरोनाचे 302 रुग्ण; देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3374 वर पोहचली)

मुंबईमधील सर्वात मोठ्या झोपडपट्टी धारावीत कोरोनाचे 5 रुग्ण आढळले आहेत. धारावीत 21 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. धारावीत आतापर्यंत अडीच हजार पेक्षा जास्त जणांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

दरम्यान, आज राज्यात दुपारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 661 इतकी होती. त्यात वाढ होऊन आता हा आकडा 690 इतका झाला आहे. तसेच देशात गेल्या 12 तासांत कोरोनाचे 302 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3374 वर पोहचली आहे. यातील 3030 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच 267 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय 77 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.