Coronavirus: भारतात गेल्या 12 तासांत कोरोनाचे 302 रुग्ण; देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3374 वर पोहचली
Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

Coronavirus: भारतात गेल्या 12 तासांत कोरोनाचे 302 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3374 वर पोहचली आहे. यातील 3030 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच 267 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय 77 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने माहिती दिली आहे.

दरम्यान, शनिवारी महाराष्ट्रात 145 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 635 वर पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 32 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज राजस्थानमध्ये 6 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील एका रुग्णाने दिल्लीतील तबलीगी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सध्या राजस्थानमधील कोरोनाग्रस्तांची संख्या 210 वर पोहचली आहे. याशिवाय लखनऊमध्ये गेल्या 48 तासांत 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या रुग्णांनीदेखील दिल्लीतील तबलीगी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (हेही वाचा - पुणे येथील उद्योजकाने तयार केले Sanitization Unit; 15 मिनिटांत नष्ट करणार 99.99% बॅक्टेरिया)

स्पेन, इटली, जर्मनी, अमेरिका या देशांत कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अमेरिकेत तब्बल 300,000 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 8300 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. याशिवाय जगात 11 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जगभरात कोरोनाने घेतलेल्या बळींची संख्या 60,000 वर पोहचली आहे.