कोंबडा झाकला म्हणून आरवणे थांबत नाही! कोरोना संकटाआधी देशाची अर्थव्यवस्था ढासळतीचं होती; अशोक चव्हाण यांचा केंद्र सरकारवर निशाणा
Ashok Chavan (Photo Credits-ANI)

काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवरून (Country's Economy) केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशावरील आर्थिक संकट ही ‘देवाची करणी’ आहे, असे सांगून केंद्र सरकार आपले आर्थिक अपयश लपवू पाहत आहे. पण कोंबडा झाकला म्हणून आरवणे थांबत नाही. कोरोना तर आता आला. मात्र, त्यापूर्वीही देशाची अर्थव्यवस्था (Indian Economy) ढासळतीचं होती आणि त्यासाठी नोटबंदी व सदोष GST सारखी केंद्राची ‘करणी’ कारणीभूत आहे, अशी स्पष्ट टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्था ढासळण्यामागील तीन कारणं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सांगितले आहेत. नोटबंदी, GST आणि अयशस्वी लॉकडाउन यांचा समावेश आहे. या तीन कारणांमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -  Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभेसाठी काँग्रेसची तयारी, राहुल गांधी व्हर्च्युअल सभांमधून करणार मार्गदर्शन)

राहुल गांधी यांच्या या ट्विटला अशोक चव्हाण यांनी रिट्विट करत देशाची अर्थव्यवस्था ढासळतीचं होती आणि त्यासाठी नोटबंदी व सदोष GST सारखी केंद्राची ‘करणी’ कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदावरून सध्या पक्षांतर्गत वादविवाद सुरू आहे. गांधी कुटुंबाव्यतिरिक्त दुसऱ्याला अध्यक्ष पद द्यावं, अशी भूमिका सोनिया गांधी आणि राहुल यांनी घेतली आहे. मात्र, राहुल गांधी यांनीचं काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.