Marriage | (Representational Purpose | Photo Credits: Pixabay.com)

ठाणे येथील एका महिलेस पोलिसांनी (Thane Police) ताब्यात घेतले आहे. या महिलेने पाकिस्तानातील तरुणाशी ऑनलाईन विवाह (Online Marriage) केल्याचा, आणि या विवाहासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. या महिलेने कथितरित्या पाकिस्तानी व्यक्तीशी विवाह केला आहे. तसेच, त्या पुरुषाला भेटण्यासाठी आणि पाकिस्तानी व्हिसा मिळविण्यासाठी बनावट नाव आणि आधार कार्डसह खोट्या कागदपत्रांचा वापर केला असावा, असा संशय असल्याने पोलीस या प्रकरणाचा तपास (Police Investigation) करत आहेत. या प्रकरणात ही महिला अथवा इतर कोणाला अद्याप अटक झाली नाही. मात्र, तिची चौकशी सुरु असल्याचे समजते.

फेसबुकच्या माध्यमातून ओळख

पोलिसांनी दावा केला आहे की, सदर महिलेचे मूळ नाव नगमा नूर मकसूद अली आहे. मात्र, ती सनम खान रुख नावाने वावरते. ही महिला 17 जुलै रोजी घरी परतली. काही काळापूर्वी ती इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील व्यक्तीच्या संपर्कात आली होती. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, सनम या नावाने ओळखली जाणारी नगमा हिचा फेसबुकच्या माध्यमातून पाकिस्तानातील बाबर बशीर याच्याशी संपर्क झाला. बशीर हा पाकीस्तानातील अबोटाबाद येथील राहणारा आहे. फेसबुकच्या माध्यमातून दोघे परस्परांच्या प्रेमात पडले. त्यातून त्यांनी एकमेकांची मोबाईल क्रमांक घेतले. त्यानंतर दोघांनी भेटण्याचे निश्चित केले. त्यातून नगमाने पाकिस्तानी व्हिसासाठी अर्ज केला, जो सुरुवातीला नाकारण्यात आला. (हेही वाचा, पाकिस्तानात जाण्यासाठी महिलेने बनावट कागदपत्रांचा केला वापर, गुन्हा दाखल)

फेब्रुवारी 2024 मध्ये 'ऑनलाईन विवाह'

दरम्यान, नगमा आणि बाबर यांचा फेब्रुवारी 2024 मध्ये 'ऑनलाईन विवाह' झाला. त्यानंतर तिने व्हिसासाठी पुन्हा अर्ज केला. मात्र, या वेळी कागदपत्रे सादर करताना तिने त्यावर कथितरित्या सनम नावाचा वापर केला. तिने यशस्वीरित्या व्हिसा मिळवला आणि 17 जुलै रोजी भारतात परतली, असा पोलिसांचा दावा आहे.

पोलिसांच्या दाव्याचे आईकडून खंडण

नगमा उर्फ सनम हिची आई ठाणे येथे राहते. तिने पोलिसांच्या दाव्याचे खंडण केले आहे. त्यांनी म्हटले की, त्यांची मुलगी (सनम) हिने 2015 मध्ये नगमाने पतीपासून वेगळे झाल्यानंतर तिचे नाव बदलले आणि मुलांची नावे देखील बदलली.

सध्यास्थिती

दरम्यन, पोलिसांनी नगमाला ताब्यात घेतले नाही किंवा अटक केली नसून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ते व्हिसा मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरण्याची शक्यता शोधत आहेत. हे प्रकरण संशयास्पद दस्तऐवज वापरून ऑनलाइन विवाह आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासंबंधीच्या गुंतागुंत आणि संभाव्य कायदेशीर समस्या यांच्याशी संबंधीत आहे. प्रकरणाचा पोलीस तपास सुरु आहे. तपासादरम्यान अनेक बाबींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.