हिंदी सिनेमात काम देतो असं आमिष दाखवून महिला कलाकाराचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तीन जणांना अटक केली आहे. शुक्रवारी ठाण्यातून (Thane) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. 24 वर्षीय पीडितेने कासारवडवली पोलिस स्टेशनमध्ये (Kasarvadavali Police Station) गुरुवारी तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. राहुल तिवारी (30), त्याची बहिण कंचन यादव (25), राकेश यादव (35) आणि बिरलाल यादव (30) अशी या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी हिंदी सिनेमातील भूमिकेसाठी शॉर्टलिस्ट झाल्याचे आरोपीने पीडितेला सांगितले. त्यानंतर ठाण्यामध्ये दिग्दर्शक आणि निर्मात्यांची भेट घेण्यास सांगितले. तसंच भूमिका मिळवण्यासाठी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचेही बजावून ठाण्यातील जी.बी. रोडवरील फार्महाऊसवर गुरुवारी भेटण्यास बोलावले. (Nagpur: नागपूर येथील महिला होमगार्डचा विनयभंग, पोलीस उपनिरीक्षक निलंबित)
गुरुवारी संध्याकाळी आरोपी आपल्या कारमधून महिलेला एका ठराविक ठिकाणी घेऊन गेले. प्रवासादरम्यान बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. परंतु, पीडितेने हिंमत एकवटून गुपचून मनसे कार्यकर्त्यांच्या संपर्कात असलेल्या आपल्या नातेवाईकाला फॉर्महाऊसचे लोकेशन पाठवले.
मनसे कार्यकर्त्ये घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. मनसे कार्यकर्त्यांकडून आरोपींना बेदम मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओ अमेय खोपकर यांनी शेअर केल्यानंतर प्रचंड व्हायरल झाला होता. गुरुवारी रात्री कार्यकर्त्यांनी आरोपींना कासारवडवली पोलिस स्थानकात नेले. तिथे त्यांच्याविरुद्ध आयपीसी कलम 354, 509, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.