Thane: वीज बील कमी करुन देण्याच्या नावाखाली 25 ग्राहकांची 19.6 लाख रुपयांची फसवणूक; 2 जण अटकेत
Arrested (Photo Credits: Facebook)

ठाणे (Thane) जिल्ह्यातील वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या 25 ग्राहकांची 19.6 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंब्रा (Mumbra) येथून पोलिसांनी (Police) दोघांना अटक केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आरोपींनी ग्राहकांसमोर कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून वीज बिल कमी करण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केली. अटक केलेल्या आरोपींची नावे रफिक अहमद शेख (Rafique Ahmed Shaikh) (39) आणि अब्दुल्ला बिलाल शेख (Abdulla Bilal Shaikh) (25) अशी आहेत.

काही अज्ञात व्यक्तींनी फसवणूक केल्याच्या तक्रारी कंपनीला प्राप्त झाल्या होत्या. आरोपी व्यक्तींनी ग्राहकांशी संपर्क साधला आणि त्यांचे वीज बिल कमी करण्याची ऑफर दिली. आरोपींनी ग्राहकांकडून पैसे गोळा केले आणि त्यांना बनावट पावती दिली. नंतर हे पैसे घेऊन आरोपी फरार झाले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

साबेगाव येथील एका डेअरी मालकाची आरोपीने अशाच प्रकारे फसवणूक केली. आरोपीने डेअरी मालकाला 68,000 रुपयांचे वीज बिल कमी करण्याची ऑफर दिली आणि डेअरी मालकाकडून 50 टक्के रक्कम वसूल केली. बिलात पैसे भरले गेले नसल्याचे लक्षात आल्यावर पीडित व्यक्तीने शिल डायघर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणूक, बनावट अशा विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला होता.

वीज पुरवठा करणाऱ्या कंपनीला अशाच अनेक तक्रारी आल्यामुळे त्यांनी तपास सुरू करणाऱ्या पोलिसांशी संपर्क साधला. विविध ठिकाणांहून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींना शोधून काढले. (Navi Mumbai Online Fraud: नवी मुंबईत 21 वर्षीय तरुणीची 2 लाखांची ऑनलाइन फसवणूक, आरोपीचा शोध सुरू)

आरोपींनी कंपनीचे कर्मचारी म्हणून ग्राहकांशी संपर्क साधला आणि त्यांच्या बिलाची रक्कम कमी करण्याची ऑफर दिली. त्यांच्याकडून रक्कम गोळा केली आणि त्यांना बनावट पावत्या देऊन पळ काढला असे पोलिसांच्या तपासादरम्यान निष्पन्न झाले. आरोपींनी या पैशातून घेतलेला महागडा मोबाईलही पोलिसांनी जप्त केला. या गुन्ह्याचा पुढील तपास शीळ डायघर पोलीस करत आहेत.