ठाण्याच्या (Thane) मुंब्रा टाउनशिपमधील देवरीपाडा परिसरात शनिवारी 25 फेब्रुवारी रोजी एका व्यक्तीने आपल्या शेजाऱ्याच्या पाच वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांच्या मुलीला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याचा आरोप आहे. यात मुलाचा मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाली आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे, मुंब्रा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी याबाबत माहिती दिली.
आसिफ असे आरोपीचे नाव असून त्याला सोमवारी त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आसिफ आणि त्याच्या पत्नीला मूल नाही. हे दोघे पीडितेचे शेजारी होते.
आरोपीची पत्नी ही पीडितेच्या आईची मैत्रिण होती. या दोघींमध्ये जवळीक होती. दोघी एकमेकींशी अनेक गोष्टी शेअर करायच्या. हीच गोष्ट आसिफला आवडत नव्हती. आरोपी आसिफ आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असत. शनिवारी आरोपीने अचानक दोन अल्पवयीन मुलांना इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिले. यामध्ये मुलगा जागीच मरण पावला आणि मुलीला गंभीर दुखापत झाली. (हेही वाचा: Mumbai: तीन अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधमाला अटक)
परंतु मुलगी कशीबशी उठली व तिने घरी जाऊन आपल्या वडिलांना त्यांच्या शेजाऱ्याने तिला व तिच्या भावाला इमारतीवरून फेकून दिल्याची माहिती दिली. कोल्हटकर यांनी पुढे सांगितले. मुलांच्या आईच्या तक्रारीच्या आधारे, त्यांनी आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 302 (खून) आणि 307 (हत्येचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत. या गुन्ह्यामागील नेमका हेतू काय होता याची चौकशी केली जात आहे.