Schools Reopen in Thane: ठाण्यातील शाळाही 4 ऑक्टोबरपासून सुरु
School Reopen (Photo Credits: PTI)

कोविड-19 संकटाच्या (Covid-19 Pandemic) पार्श्वभूमीवर बंद असलेल्या ठाणे (Thane) येथील शाळा देखील 4 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांनी शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यानंतर आता ग्रामीण भागातील 5 ते 12 इयत्तांचे आणि पालिका क्षेत्रातील 8 ते 12 वीचे वर्ग सुरु होणार आहेत. मात्र शासनाने घालून दिलेल्या कोरोना निर्बंधांचे कोटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या बैठकीत शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शाळा सुरु करण्यापूर्वी सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण होणे गरजेचे आहे. लसीकरण पूर्ण न झालेल्या शिक्षकांचे कोरोना लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश नार्वेकर यांनी आरोग्य विभागास दिले. त्याचबरोबर शाळांची साफ सफाई, सॅनिटायझर फवारणी, स्वच्छताविषयक कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही नार्वेकर यांनी दिले आहेत. (Schools Reopen in Maharashtra: राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु; शिक्षक आणि विद्यार्थ्यांसह पालकांनाही करावे लागणार 'या' नियमांचे पालन)

मुंबई मधील शाळा सुरु करण्याबाबत बीएमसीने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या नियमांचे पालन करणे सर्व शाळांसाठी बंधनकारक असणार आहे. याशिवाय विद्यार्थी आणि पालकांही काही नियम पाळावे लागणार आहेत. कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नसल्याने या नियमांचे काटेकोरपणे पालन होणे अत्यंत गरजेचे आहे.

दरम्यान, राज्यभरातील शाळा मागील दीड वर्षांपासून बंद होत्या. ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरु होते. त्यामुळे शाळा नेमक्या कधी सुरु होणार या प्रतिक्षेत पालक व विद्यार्थी होते. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली आहे. मात्र अद्याप सर्व इयत्तांचे वर्ग सुरु करण्यात आलेले नाही.