प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबईबाबत नेहमीच तक्रार होत असते की, शहरात नेहमी कोणते ना कोणते काम चालू असते व त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ठाण्यातील (Thane) गांधीनगर पुलाबाबतही (Gandhinagar Flyover) असेच घडले. आता तब्बल सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर गांधीनगर उड्डाणपूलाचा वापर प्रत्यक्षात होणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी, 7 जून रोजी सांगितले की, 10 जूनपर्यंत या पुलाचे बांधकाम पूर्ण होईल. फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिले आहे.

टीएमसीचे शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा म्हणाले, ‘पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा पूल शहरासाठी महत्त्वाचा आहे आणि अलीकडे त्याचे काम जोरात सुरू आहे.’ हा पूल कार्यान्वित झाल्यानंतर, पोखरण लेन 2 वर कमी गर्दी होईल. जून अखेरपर्यंत हा पूल नागरिकांसाठी सुरु होईल. यामुळे आशा आहे की, पावसाळ्यात वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.

सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर ते माजिवडापर्यंत मोठी कोंडी झाली आहे. पुलाच्या प्रलंबित कामामुळे सध्या अनेकजण शहरात प्रवेश करण्यासाठी पर्यायी असलेल्या पोखरण रोड 2 चा वापर करत आहेत व त्यामुळे या मार्गावरही गर्दी होत आहे. आता हा पूल पूर्ण होऊन वाहतुकीसाठी पुन्हा खुला केल्याने, रस्त्यावरील गर्दी कमी होईल आणि ज्यांना येऊर, हिरानंदानी मेडोज, वसंत विहार, उपवन आणि सिद्धाचल ते घोडबंदरला जोडायचे आहे त्यांना मदत होईल.

याआधी 2016 मध्ये, ठाणे महापालिकेद्वारे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आणि नंतर 2017 मध्ये, नागरी संस्थेने 6 कोटी रुपयांमध्ये उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले. या कामामुळे माजिवडा, हिरानंदानी इस्टेट, उपवन, सिद्धांचल आणि घोडबंदर भागातील रहिवासी आणि प्रवाशांना रस्त्यावरील मोठ्या गर्दीचा सामना करावा लागला. (हेही वाचा: मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार! नवी मुंबईतील 'या' भागांचा 8 जूनपासून पाणीपुरवठा विस्कळीत)

याआधी फेब्रुवारी 2023 मध्ये ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील महिंद्राकर यांनी पुलाच्या विलंबाबद्दल टीएमसीसमोर निदर्शने केली आणि धमकी दिली की, जर नागरी अधिकारी पावसाळ्यापूर्वी पुलाचे काम पूर्ण करू शकले नाहीत, तर ते विलंबाबद्दल अधिकार्‍यांचा सत्कार करून पुन्हा निदर्शने करतील.