ठाणे रेल्वे स्टेशन आता अधिक सुरक्षित; गुप्तचर विभागाच्या मदतीने 'ब्ल्यू प्रिंट' तयार, शॉर्टकट मारणाऱ्या प्रवाशांची गच्छंती
Thane Railway Station | (Photo Courtesy: Wikimedia Commons)

Thane Railway Station will be more secure: ठाणे रेल्वे स्टेशन (Thane Railway Station) सुरक्षिततेच्या दृष्टीने आता अधिक अद्ययावत होणार आहे. त्यासाठी रेल्वे स्टेशनवर प्रवेश करण्यासाठी प्रशासनाने आखून दिलेले अधिकृत मार्गच खुले ठेवण्यात येणार आहेत. तर, रेल्वे स्टेशनवर प्रवेश करण्यासाठी शॉर्टकट मारत इतर मार्गांचा वापर करत घुसखोरी करत असलेल्या प्रवाशांचे इतर 20 अनधिकृत प्रवेशमार्ग बंद करण्यात येणार आहेत. या शार्टकटमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होते असे सांगत प्रशासन अनधिकृत असलेले हे सर्व मार्ग बंद करणार आहे. विशेष म्हणजे स्टेशनवरील सुरक्षेचा विचार करताना रेल्वेने गुप्तचर विभागाचेही सहाय्य घेतले आहे. रेल्वे स्टेशनवरील सुरक्षेचा विचार करताना गुप्तचर विभागाची मदत घेण्याची ठाणे रेल्वे प्रशासनाची बहुदा ही पहिलीच वेळ असावी.

सध्यास्थितीत ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रवेश करण्यासाठी आणि स्टेशनमधून बाहेर निघण्यासाठी एकूण 27 मार्ग उपलब्ध आहेत. त्यातील तब्बल 20 मार्ग हे अनधिकृत म्हणजेच बेकायदा आहेत. बेकायदेशीर मार्गे स्टेशनमध्ये प्रवेश केल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होत आहे. त्यामुळे अनधिकृत असलेले सर्व मार्ग बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार स्टेशनातील प्रवाशांची संख्या विचारात घेत अधिकृत असलेल्या सात प्रवेश मार्गांवरील सुरक्षा अधिक कडक करण्यात येणार आहे. तसेच, प्रवासी संख्या पाहून त्यानुसार प्रवेशद्वारांवर सुमारे आठ ते दहा डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर व देखरेखीसाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. (हेही वाचा, रेल्वे प्रवासाला निघालाय? थांबा! भारतीय रेल्वेच्या 350 गाड्या रद्द; तिकिटाचे पैसेही मिळणार परत)

प्राप्त माहितीनुसार, ठाणे रेल्वे स्टेशन पूर्व दिशेला तीन तर पश्चिम दिशाला चार प्रवेश मार्ग अधिकृत ठेवण्यात येतील. तर, सध्यास्थितीत वापरण्यात येणारे उर्वरीत 20 प्रवेशमार्ग बंद करण्यात येतील. दीर्घ पल्ल्याच्या प्रवासासाठी निघालेल्या प्रवाशांची सुरक्षीतता विचारात घेऊन प्रवेशद्वारावर बॅग स्कॅनर. तसेच, स्टेशन परिसरातील वाहनांच्या तपासणीसाठी कम्प्युटराइज्ड वाहन तपासणी यंत्रणाही उभारण्यात येणारआहे.