COVID-19 रुग्णाच्या उपचारासाठी लागणाऱ्या रेमडीसिवीर, टॉसिलिझुमब इंजेक्शन चा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा ठाणे पोलिसांकडून पर्दाफाश
रेमडीसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक (PC - Twitter)

कोरोना रुग्णावरील (Corona Patients) उपचारासाठी लागणाऱ्या Remdesivir आणि Tocilizumab Injection चा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काळ्या बाजारात अधिक दराने औषधे विकत होते. सध्या बाजारात रेमडीसिवीर आणि टॉसिलिझुमब इंजेक्शनची किंमत 5 हजार 400 रुपये इतकी आहे. परंतु, आरोपी हे दोन्ही इंजेक्शन 25 हजार आणि 50 हजार रुपयांना विकत होते. (हेही वाचा - Maharashtra Monsoon 2020: मुंबई सह उपनगरांमध्ये काल रात्री हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसला; कोकणात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज- IMD)

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना आणि अन्न व औषध प्रशासनाला जास्त दराने औषधांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश दिले होते. ठाणे पोलिसांना औषधांचा काळाबाजार करणाऱ्या टोळीची माहिती मिळाली होती. त्यामुळे ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून अरुणसिंग (वय 35), सुधाकर गिरी (वय 37) आणि रविंद्र शिंदे (वय 35) या तिघांना अटक केली. तसेच त्यांच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी वसीम शेख (वय 32) आणि अमिताभ दास (वय 39) या दोन आरोपींचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.