ठाणे मनसे कार्यकर्ता प्रवीण चौगुले ची आत्महत्या; राज ठाकरेंना ईडीची नोटीस दिल्याने आत्महत्या केल्याचा दावा
MNS Worker Pravin Chowgule ( Photo Credits: Facebook/ Pravin Chowgule)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना रविवारी (18 ऑगस्ट) ईडीकडून कोहिनूर मिल प्रकरणी (Kohinoor CTNL) नोटीस पाठवण्यात आली होती. यानंतर महराष्ट्राभरात राजकीय वातावरण तापलं आहे. मनसे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. यामधूनच ठाणे येथील मनसे कार्यकर्ते प्रवीण चौगुले (Pravin Chowgule) याने स्वतःला पेटवून घेऊन आपलं आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. काल (20 ऑगस्टच्या) रात्री प्रवीणने आत्महत्या केली. या आत्महत्येमागे राज ठाकरेंना पाठवण्यात आलेल्या ईडी नोटीसीचा राग आणि दु:ख असल्याचा दावा त्याच्या मित्राकडून करण्यात आला आहे. प्रवीण 85% भाजला होता. भाजलेल्या अवस्थेमध्ये त्याला ठाण्यातील शिवाजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र हॉस्पिटलमध्ये आणण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन; ED कार्यालयाजवळ शक्तीप्रदर्शन टाळा, खास ट्विट द्वारा आवाहन

मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी काही दिवसांपूर्वी ठाणे बंदचं आवाहन केलं होतं. मात्र त्यानंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आदेश दिले आहेत. प्रवीण चौगुले हा मुंबईत विटावा भागात घरी एकटा राहत होता. मागील अनेक वर्षांपासून प्रवीण मनसे कार्यकर्ता आहे. काल दिवसभर प्रवीण याने राज ठाकरेंना पाठवण्यात आलेल्या ईडीच्या नोटीशीचा निषेध करणार्‍या अनेक फेसबूक पोस्ट शेअर केल्या होत्या. प्रवीण अनेक मोर्च्यांमध्ये स्वतःच्या अंगावर मनसेचा झेंडा ऑईलपेंटने रंगवून घेत पुढे असयचा. राज ठाकरेंना धाडण्यात आलेल्या नोटीशीमुळे तो मागील काही दिवसांपासून दु:खी होता असेही त्याच्या मित्राने सांगितले आहे. यामधूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा दावा करण्यात आला आहे. MNS चा 22 ऑगस्टचा 'ठाणे बंद' रद्द; राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांना लोकांना त्रास होईल अशा गोष्टी टाळण्याचं आदेश

राज ठाकरेंना कोहिनूर मिल प्रकरणी 22 ऑगस्ट दिवशी ठाणे येथील ईडी कार्यालयात हजेरी लावायची आहे. तसेच नोटिशीला उत्तर द्यायचं आहे. यापूर्वी कोहिनूर मिल प्रकरणात त्यांचे साथीदार उन्मेष जोशी आणि राजन शिरोडकर यांची चौकशी झाली आहे.