राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन; ED कार्यालयाजवळ शक्तीप्रदर्शन टाळा, खास ट्विट द्वारा आवाहन
राज ठाकरे (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना रविवारी (18 ऑगस्ट) दिवशी ED कडून नोटीस आल्यापासून मुंबई, ठाणे सह महाराष्ट्रात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. 22 ऑगस्ट दिवशी राज ठाकरेंना ईडी नोटीसीचं उत्तर देण्यासाठी कार्यालयात हजर व्हायचं आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरूवातीला ठाणे बंदचं आवाहन करण्यात आलं होतं मात्र राज ठाकरेंच्या आवाहनानंतर ते मागे घेण्यात आलं. त्यापाठोपाठ आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीच्या नोटीशीचा निषेध करत त्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत शक्तिप्रदर्शन करणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र आता खुद्द राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केलं आहे. तसेच ईडीच्या कार्यालयाजवळ जमू नये असं आवाहन केलं आहे. MNS चा 22 ऑगस्टचा 'ठाणे बंद' रद्द; राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांना लोकांना त्रास होईल अशा गोष्टी टाळण्याचं आदेश

राज ठाकरे यांनी केलेल्या ट्वीटनुसार, 'महाराष्ट्रभरातील मनसे कार्यकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस आणि सामान्यांना आंदोलनामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या. ईडीच्या नोटिशीचा आदर करा असं आवाहन केलं आहे. यासोबतच मला नोटीशीची सवय आहे. कार्यकर्त्यांनो तुम्हांला डिवचण्याचा प्रयत्न केला जाईल पण शांत रहा. योग्य वेळ आली की या विषयावर बोलू असेही त्यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.  राज ठाकरे 22 ऑगस्टला 'ईडी'च्या चौकशीला सामोरे जाणार; मनसे कार्यकर्ते करणार शक्तीप्रदर्शन

राज ठाकरे ट्वीट

आज कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांचे साथीदार राजन शिरोडकर, मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांची चौकशी केली आहे. सत्ताधारी भाजप राजकीय सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याची सध्या महाराष्ट्रातील मनसैनिकांची भावना आहे.