मुंबई: राज ठाकरे 22 ऑगस्टला 'ईडी'च्या चौकशीला सामोरे जाणार; मनसे कार्यकर्ते करणार शक्तीप्रदर्शन
Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या सक्तवसुली संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीच्या रडारवर आहेत. त्यांना नुकतीच ईडीची नोटीस मिळाली. या नोटीशीला प्रतिसाद देत राज ठाकरे हे येत्या 22 ऑगस्ट रोजी इडीच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार आहेत. सरकार सुडाच्या भावनेतून आणि दबाव टाकण्यासाठी तसेच विरोधातला आवाज बंद करण्यासाठीच अशा प्रकारची खेळी ईडीच्या आडून करत असल्याचा मनसेचा आरोप आहे. त्यामुळे येत्या 22 तारखेला मनसेकडून ईडी आणि सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. राज ठाकरे यांना आलेल्या ईडीच्या नोटीशीच्या पार्श्वभूमिवर मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक मुंबई येथील दादर परिसरात पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

राज ठाकरे यांना आलेल्या नोटीशीचा निशेध करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे परिसरात बंदचे आयोजन केले होते. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी पक्ष नेतृत्वाच्या आदेशानंतर मनसेने हे आंदोलन मागे घेतले. मात्र, पक्षाने हे आंदोलन मागे घेतले असले तरी, मनसे कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संतापातूनच येत्या 22 तारखेला मनसे कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत. राज ठाकरे जेव्हा ईडी कार्यालयात जातील तेव्हा मनसेचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणावर कार्यालयाबाहेर उपस्थित राहतील असे संकेत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिले आहेत. या वेळी कार्यकर्त्यांनी यावे मात्र सोबत गाड्या वैगेरे घेऊन येऊ नये असेही नांदगावर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मनसे कार्यकर्ते हे पक्षादेश पाळतील. ते शांततेत शक्तीप्रदर्शन करतील असेही बाळा नांदगावकर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. या पत्रकार परिषदेस मनसेचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राज ठाकरे हे गेले प्रदीर्घ काळ सत्ताधारी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर ईव्हीएमवरुन आक्रमक निशाणा साधत आहेत. त्यामुळेच सरकारने ईडीला पुढे करुन डाव खेळल्याची भावना काही मनसे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. (हेही वाचा, MNS चा 22 ऑगस्टचा 'ठाणे बंद' रद्द; राज ठाकरे यांचे मनसे कार्यकर्त्यांना लोकांना त्रास होईल अशा गोष्टी टाळण्याचं आदेश)

काय आहे प्रकरण?

मायानगरी मुंबईतील मध्यवर्थी असलेल्या दादर परिसरात 'कोहिनूर स्क्वेअर' या भव्य प्रकल्पातील गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने राज ठाकरे कोहिनूर समूहाचे उन्मेष जोशी व राज यांचे भागीदार राजन शिरोडकर यांना नोटीस बजावली आहे. या नोटीशीनंतर ईडीने उन्मेष जोशी यांची काल (सोमवार, 19 ऑगस्ट 2019) रोजी सखोल चौकशी केली. ही चौकशी सुमारे साडेसात तास सुरु होती. आजही (मंगळवार, 20 ऑगस्ट 2019) जोशी यांची ही चौकशी सुरु आहे. आज उन्मेष जोशी यांच्यासोबत राजन शिरोडकरही उपस्थित आहेत. राज ठाकरे यांना ईडीने 22 ऑगस्ट ही तारीख दिली आहे. त्यामुळे 22 ऑगस्ट रोजी राज ठाकरे हे ईडीच्या कार्यालयात चौकशीला सामोरे जातील.