Metro (PC- Wikimedia Commons)

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MahaMetro) लवकरच ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प कॉरिडॉरसाठी (Thane Integral Ring Metro Project Corridor) निविदा प्रक्रिया सुरू करणार आहे. साधारण 29 किमी लांबीचा हा कॉरिडॉर ठाणे शहराच्या पश्चिमेकडील परिघावर 22 स्थानकांसह धावेल. नेटवर्क एका बाजूला उल्हास नदी आणि दुसऱ्या बाजूला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (SGNP) यांनी वेढलेले आहे. प्रमुख व्यावसायिक केंद्रांना जोडणारा आणि कर्मचाऱ्यांच्या मोठ्या वर्गासाठी प्रभावी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देणारा हा कॉरिडॉर, 2029 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मेट्रो मार्गामुळे हजारो दैनंदिन प्रवाशांना, विशेषत: विद्यार्थ्यांना आणि कार्यालयात आणि कामाच्या ठिकाणी दररोज प्रवास करणाऱ्यांना जलद आणि किफायतशीर वाहतूक पर्याय उपलब्ध होईल. महामेट्रोच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाकडून या प्रकल्पासाठी मंजुरी मिळाली आहे. निविदा कागदपत्रे तयार करण्याचे काम सुरू केले आहे. प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी ते लवकरात लवकर निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा विचार करत आहेत.

या कनेक्टिव्हिटीमुळे वाहतुकीचे शाश्वत आणि कार्यक्षम साधन उपलब्ध होईल, ज्यामुळे शहराची आर्थिक क्षमता वाढेल आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होईल. यासह हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यात हातभार लागेल अशी अपेक्षा आहे. भारत सरकार (GoI) आणि महाराष्ट्र सरकार (GoM) कडून समान इक्विटी तसेच द्विपक्षीय एजन्सीकडून अंशतः निधीसह प्रकल्पाची अंदाजे किंमत 12,200.10 कोटी रुपये आहे. स्टेशन नेमिंग आणि ऍक्सेस राइट्स फॉर कॉर्पोरेट, मालमत्तेचे मुद्रीकरण, व्हॅल्यू कॅप्चर फायनान्सिंग मार्ग यासारख्या नाविन्यपूर्ण वित्तपुरवठा पद्धतींद्वारे देखील निधी उभारला जाईल. (हेही वाचा: Samruddhi Expressway to Get Wayside Hubs: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील अपघात कमी होण्याची शक्यता; पुढील सहा महिन्यात एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूंना निर्माण होऊ शकतात मुलभूत सुविधा)

प्रकल्पामुळे 2029, 2035 आणि 2045 या वर्षांसाठी मेट्रो कॉरिडॉरवर अनुक्रमे 6.47 लाख, 7.61 लाख आणि 8.72 लाख प्रवाशांची एकूण दैनंदिन प्रवासी संख्या वाढेल. महामेट्रो सध्या नागपूर आणि पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प राबवत आहे आणि त्यामध्ये ठाणे रिंग मेट्रोचा समावेश केला आहे. महामेट्रोला एकूण कॉरिडॉरच्या अंदाजे 8 किमीच्या डिझाइनसाठी पाच सल्लागारांकडून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. ठाणे महानगरपालिकेकडे (TMC) सुरुवातीला प्रकल्प राबविण्याचे काम सोपविण्यात आले होते, नंतर ते महामेट्रोकडे सोपवण्यात आले.