ठाण्यामध्ये (Thane) एका 16 वर्षीय मुलावर प्राणघातक हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दहावीची सराव परीक्षा देऊन घरी निघालेल्या शाळकरी मुलावर चाकूने हल्ला झाला आहे. हा प्रकार ठाण्याच्या वर्तकनगर (Vartaknagar) मध्ये घडला आहे. सध्या या मुलावर खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. शरीरावर वार झाल्याने सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी मुलाची स्थिती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान या मुलावर वार करणारा हल्लेखोर पळून गेला आहे.
हल्ला झालेला मुलगा वर्तकनगर मधील भीम नगर भागात राहत होता. मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहे. गुरूवार (18 जानेवारी) दिवशी सकाळी दहावीची परीक्षा आटपून तो घरी जात असताना 3 जणांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यामुळे आजुबाजूच्या भागात घबराट पसरली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थ्याला एका रिक्षा चालकाने हॉस्पिटल मध्ये नेले. Bangalore Shocker: लग्नास नकार दिल्याने ऑफिसबाहेर मैत्रिणीवर चाकूहल्ला, आरोपी अटकेत .
मुलावर हल्ला झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता त्यामुळे त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू झाले. या घटनेनंतर स्थानिक वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस सध्या फरार हल्लेखोरांचा शोध घेत असून या हल्ल्यामागचे नेमके कारण अजून पर्यंत समजू शकलेले नाही.