महाराष्ट्रातील ठाणे (Thane) जिल्ह्यात यावर्षी जानेवारी ते 13 ऑक्टोबर या कालावधीत 660 हून अधिक अंमली पदार्थांशी संबंधित गुन्हे (Drug-Related Offences) दाखल करण्यात आले आहेत. या संदर्भात तब्बल 771 जणांना अटक करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या कालावधीत ड्रग्ज तस्करांकडून 3.68 कोटी रुपयांचे ड्रग्ज आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समन्वय समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी ही आकडेवारी दिली. ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलचे (एएनसी) वरिष्ठ निरीक्षक संजय शिंदे यांनी बैठकीत सांगितले की, या कालावधीत गांजाशी संबंधित एकूण 39 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 53 जणांना अटक करण्यात आली आहे. यासह 739,116,46 रुपये किमतीचा 739 किलो गांजा जप्त करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, 64,92,870 रुपये किमतीचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून, त्याचे वजन 1.585 किलो आहे. याप्रकरणी 48 जणांना अटक करण्यात आली असून 29 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (हेही वाचा: BMC COVID Scam Case: बीएमसी कोविड घोटाळा प्रकरणी ईडीकडून आठ ठिकाणी शोध)
चरस वसुलीचे सहा गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याच्याशी संबंधित 12 जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 72,74,000 रुपये किमतीचा आठ किलोपेक्षा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या कालावधीत 58,80,000 रुपये किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले असून तीन जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यासोबत 1.20 लाख रुपये किमतीचे 20 ग्रॅम एलएसडी आणि 65,80,000 रुपये किमतीचे 13 ग्रॅम हेरॉईनही जप्त करण्यात आली आहे.