छोटा राजन (Photo Credits: Twitter)

तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या गॅन्गस्टर छोटा राजन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पोस्टर झळकवण्यात आले आहेत. त्यामुळे ठाणे परिसरात खळबळ उडाली असून 2 जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्टरवर राजनला शुभेच्छा देणाऱ्याचे नाव लिहिले आहे. मात्र पोलिसांना याबाबत कोणतीच माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. ठाणे मधील नौपाडा आणि कळवा पोलीस स्थानकाच्या येथे पोस्टर लावून शहराची बदनामी करत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तलावपाळी जवळ असलेल्या गडकरी रंगायतन सभागृह, घोडबंदर रोडवरील तुळशी धाम, कळवा नाका या प्रमुख ठिकाणी पोस्टर झळकवण्यात आले. सीआर सामाजिक संघटनेकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवर 13 तारीख लिहिण्यात आली असून त्यामध्ये छोटा राजन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राजन याला आधारस्तंभ असल्याचे संबोधत त्याचे टोपणनाव नाना आणि मूळ नाव राजेंद्र सदाशिव निकालजे असा उल्लेख केला असून त्याचा फोटो सुद्धा लावण्यात आला आहे.(जालना: व्यापारी राजेश नहार यांची गोळ्या झाडून हत्या)

पोस्टरमधून शुभेच्छा देणाऱ्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हेमचंद्र दादा मोरे, ठाणे शहराचे अध्यक्ष प्रकाश भालचंद्र शेलटकर. महिला अध्यक्षा संगीता ताई शिंदे आणि मुंबई अध्यक्ष राजा भाऊ गोले यांचे नाव आणि फोटो पोस्टरवर लावण्यात आले आहेत. दरम्यान ऑक्टोबर 2015 मध्ये इंडोनेशिया येथून अटक केल्यानंतर छोटा राजन याला भारतात आणले होते. त्यानंतर त्याला दिल्लीतील तिहार तुरुंगात ठेवण्यात आहे. राजन याला मुंबईचे वरिष्ठ पत्रकार जे डे यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरण्यात आले होते.