Supriya Sule on Thane Shootout | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

ठाणे जिल्ह्यातील (Thane News) कल्याण तालुक्यात येणाऱ्या उल्हासनगर (Ulhasnagar) येथे भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी पोलीस स्टेशनमध्येच केलेल्या गोळीबारामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणानंतर विरोधी पक्ष प्रचंड आक्रमक झाला आहे. राज्यामध्ये कायद्याचे राज्य राहीले नाही. भाजपला सत्तेची मस्ती आली आहे. त्यातूनच अशा प्रकारचे कृत्य घडवले जात आहे. राज्यातील लोकशाही संपली असून दडपशाही सुरु झाली आहे, असा घणाघाती आरोप शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. (MLA Ganpat Gaikwad Shooting Case)

'राज्यातील पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचे काम'

राज्यातील पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचे काम विद्यमान राज्य सरकारच्या काळात होत आहे. देशामध्ये महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा अतिशय चांगली आहे. मात्र, त्याला नख लावण्याचे काम राज्य सरकारकडून केले जात आहे. लहान मुलांममध्ये महाराष्ट्र पोलीस हा एक अदार्श मानला जातो. त्याला जर विचारले तुला मोठेपणी काय व्हायचे आहे तर तो पोलीस व्हायचे आहे, असे सांगतो. इतकेच नव्हे तर तो पोलिसांना 'मामा' म्हणतो. राज्यातील अनेक महिलांना पोलीस स्टेशन हे आपले माहेर वाटते. आपल्याला इतर कोठेही न्याय मिळाला नाही तरी पोलीस स्टेशन हे हक्काचे ठिकाण आहे. या ठिकाणी आपणास नक्की न्याय मिळेल, असा विश्वास महिलांना वाटतो. मात्र, हा विश्वास संपविण्याचे कामच या राज्य सरकारच्या कार्यकाळात होत असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Kalyan Firing: माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यात गोळीबार, उल्हासनगरमध्ये खळबळ)

सुप्रिया सुळे घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट

उल्हासनगर येथे घडलेल्या प्रकाराबाबत आपण केंद्रीय गृहमंत्र्यांना सोशल मीडियावरुन माहिती देणार आहोत. खरे तर हा राज्याचा विषय आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने आणि प्रकरणात अडकलेल्या व्यक्ती पाहता ती भारतीय जनता पक्षाची विद्यमान आमदार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी आपण सोमवारी किंवा मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहोत. त्यांच्याही कानावर हा विषय घालणार असल्याचे, सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या प्रकरणावरुन विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही राज्य सरकारवर तीव्र टीका केली असून, राज्य सरकारच्या आडून गुंडशाही जोपासली जात आहे, असे म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना (UBT) नेते खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्र्यांमुळे आपण उद्वेगातून हा गोळीबार केल्याचे आमदार स्वत: सांगतो आहे, ही धक्कादायक बाब आहे. यावर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे काय उत्तर आहे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.