ठाकरे सरकार लवकर PMC बँक राज्य सहकारी बँकेत विलीन करणार?
PMC Bank (Photo Credits: Twitter)

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळा (PMC Bank scam) उघडकीस आल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या बँकेच्या खातेदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध घातले होते. आरबीआयच्या या निर्णयामुळे बँक खातेधारकांमध्ये मोठी नाराजी होती. तसेच आरबीआयच्या या निर्णयामुळे पीएमसीच्या ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. मात्र, आता ठाकरे सरकार या खातेदारांसाठी दिलासादायक निर्णय घेणार आहे. कॅबिनेट मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खातेदारांना चिंता करू नका, पीएमसी बँक राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती दिली आहे. (हेही वाचा - PMC Bank Scam: पीएमसी बँक संचालक जगदीश मुखे, मुक्ति बावीसी, तृप्ती बने यांना अटक; मुंबई पोलिसांची कारवाई)

यावेळी जयंत पाटील यांनी सांगितले की, राज्य सरकारचा पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पीएमसी बँकेचे राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याबाबत चर्चा सुरू आहे. हे विलीनीकरण करण्यासाठी राज्य सरकार आरबीआयशी चर्चा करणार आहे. पीएमसी बँक खातेदारकांचे पैसे बुडू नये, यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. त्यामुळे 90 ते 95 टक्के खातेदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे, असही जयंत पाटील यांनी सांगतिलं.

हेही वाचा - PMC Bank Crisis: पीएमसी बँकेचे माजी संचालक आणि भाजपचे माजी आमदार तारा सिंग यांचा मुलगा रजनीत सिंहला अटक

बुधवारी पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात तीन संचालकांना अटक करण्यात आली आहे. जगदीश मुखे, मुक्ति बावीसी आणि तृप्ती बने अशी या संचालकांची नावे आहेत. मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखा विभागाने ही कारवाई केली. त्यामुळे या बँक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 12 वर पोहचली आहे. परंतु, आता ठाकरे सरकार यावर लवकरच निर्णय घेणार आहे. त्यामुळे पीएमसी खातेदारांना दिलासा मिळणार आहे.