फडणवीस सरकारच्या काळातील 'महापोर्टल' अखेर बंद; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

शासकीय नोकरभरतीसाठी सुरू करण्यात आलेले 'महापोर्टल' (Maha Pariksha Portal) बंद करण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जोर धरत होती. अखेर महाविकास आघाडी सरकारने हे महापोर्टल बंद करण्याचा (Maha Pariksha Portal Closed) निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महापोर्टलची सुरुवात करण्यात आली होती. मागील महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याकडे महापोर्टल बंद करण्यात यावे, यासाठी निवेदन दिले होते. त्यामुळे ठाकरे सरकारने विद्यार्थी आणि नेत्यांच्या पाठपुराव्यांची दखल घेत महापोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आज एक परीपत्रकही काढण्यात आलं आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी नोकर भरतीसाठी महापोर्टल सुरु केले होते. परंतु, या पोर्टलमध्ये अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी परीक्षार्थींकडून करण्यात आल्या होत्या. तसेच हे महापोर्टल बंद करण्यात यावे, अशी मागणीही विद्यार्थी संघटनांकडून होत होती. अखेर ठाकरे सरकारने आज ही मागणी मान्य केली आहे. (हेही वाचा - ATS ची पुण्यात मोठी कारवाई; अंमली पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी उध्वस्त, 5.4 कोटींचा कच्चा माल हस्तगत)

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी महापार्टल बंद न केल्यास विधानभवनासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तसेच सरकारी नोकरभरतीच्या परीक्षा घेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी आणि फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या भरत्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही सत्यजीत तांबे यांनी केली होती.